दर्जेदार वैद्यकीय सुविधा स्वस्तात सर्वत्र उपलब्ध व्हाव्यात*
*–राज्यपाल चे.विद्यासागर राव*

*सोशल मिडीयावरील चुकीचे आरोग्य सल्लेही रोखण्याचीही गरज*

*मेडइन्स्पायर आंतरराष्ट्रीय वैद्यकीय परिषदेचे उद्घाटन*

ठाणे : जीवनशैलीशी संबंधित आजार मोठ्या प्रमाणावर वाढत असून एकीकडे हे आव्हान पेलतांना आपल्याकडे दर्जेदार वैद्यकीय सुविधा स्वस्तात सर्वत्र उपलब्ध होणे गरजेचे आहे असे राज्यपाल चे विद्यासागर राव म्हणाले. सोशल मिडीयावरील चुकीचे आरोग्य सल्ले रोखणेही आवश्यक आहे असे आवाहनही त्यांनी केले.

डॉ डी वाय पाटील विद्यापीठ येथे आयोजित मेडइन्स्पायर या आंतरराष्ट्रीय वैद्यकीय परिषदेचे उद्घाटन करतांना ते बोलत होते. यावेळी आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे, बिहार आणि त्रिपुराचे माजी राज्यपाल डॉ डी वाय पाटील यांची देखील यावेळी उपस्थिती होती.

याप्रसंगी राज्यपालांना विद्यापीठातर्फे मानद डॉक्टरेटही प्रदान करून त्यांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी दि फ्युचर स्टँडस टुडे या स्मरणीकेचेही प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले

खासदार डॉ श्रीकांत शिंदे, महापौर जयवंत सुतार, सिडकोचे अध्यक्ष प्रशांत ठाकूर, नवी मुंबई पोलीस आयुक्त संजीव कुमार, पालिका आयुक्त रामास्वामी, डॉ डी वाय पाटील विद्यापिठाचे कुलपती डॉ विजय पाटील, शिवानी पाटील, डॉ नंदिता पालशेतकर हे देखील परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी उपस्थित होते.

*मोदी केअरमुळे गरिबांना आरोग्य विमा संरक्षण*

राज्यपाल चे विद्यासागर राव यावेळी म्हणाले की, एकीकडे वैद्यकीय तंत्रज्ञान आणि आरोग्य सुविधांमुळे आयुष्यमर्यादा वाढत चालली असली तरी आपल्याकडे दर्जेदार आरोग्य सेवा अजूनही महागडी आहे आणि सर्वत्र सारख्या प्रमाणात उपलब्ध नाही. नेमकी हीच गोष्ट लक्षात घेऊन प्रधानमंत्री मोदी यांनी सुरु केलेल्या मोदीकेअर या जगातल्या सर्वात मोठ्या आरोग्य विमा योजनेमुळे १०० दशलक्ष कुटुंबाना प्रत्येकी ५ लाख रुपयांचे विमा संरक्षण मिळाले.

*वृद्धांसाठी अधिक रुग्णालये हवीत*

जगातील बहुसंख्य देशांमधील लोकसंख्येच्या तुलनेत भारतातील लोकसंख्या वयाने तरुण आहे. मात्र या युवा पिढीतही जीवनपद्धतीशी मधुमेह, उच्च रक्तदाब यासारख्या वाढत्या आजारांमुळे आरोग्य विषयक आव्हान आपल्यासमोर उभे ठाकले आहे. दरवर्षी आपल्या देशात १ दशलक्ष लोक मधुमेहामुळे उद्भवणाऱ्या व्याधींनी मरण पावतात हे पाहिले म्हणजे मधुमेहावर संशोधन करून प्रभावी औषध निर्माण करण्याची किती निकड आहे त्याची कल्पना येते. भारतातील ज्येष्ठांची, वृद्धांची संख्याही २०५० मध्ये ३४० दशलक्ष होऊन आपण ती अमेरिकेच्या एकूण लोकसंख्येलाही मागे टाकेल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.त्यामुळे भविष्यात खास वृद्धांच्या आरोग्य आणि समस्यांवर उपचार करणारी अनेक रुग्णालये उभारावी लागतील.

*प्रतीजैविकांच्या अतिसेवनाने दुष्परिणाम*

लठ्ठपणा हाही मधुमेह, ह्रदयरोग तसेच काही प्रकारच्या कर्करोगाचे कारण बनला आहे. सिप्ला कंपनीचे अध्यक्ष डॉ युसुफ हमीद यांनी मध्यंतरी प्रतीजैविकांच्या अतिसेवनाने होणाऱ्या दुष्परिणामाकडे लक्ष वेधले होते, हे सर्व पहाता वैद्यकीय क्षेत्राने यावर उपाय योजण्याची गरज आहे असेही राज्यपाल म्हणाले.

*सोशल मिडीयावरील चुकीचे वैद्यक सल्ले*

सोशल मिडीया झपाट्याने लोकप्रिय झाला आहे असे सांगून राज्यपाल म्हणाले की याद्वारे देखील प्रचंड प्रमाणावर चुकीचे आरोग्य सल्ले आणि बोगस उपचार सांगितले जात आहेत. अशा “डॉक्टर सोशल मिडीया” मुळे देखील समाजाच्या स्वास्थाला हानी पोहचत आहे हे पहाता वैद्यक क्षेत्राने योग्य माहिती सोशल मिडीयावर जाईल हे पाहिले पहिजे.

यावेळी राज्यपालांनी राज्यातील २८ जिल्ह्यांमध्ये मेमरी क्लिनिक्स सुरु करण्याच्या आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घोषणेचे स्वागतही केले.  आपण सगळ्यांनी एकत्र येऊन देशातील वैद्यकीय शिक्षणाचा दर्जा सुधारण्याची गरज आहे असेही ते म्हणाले.

*राज्यातील आरोग्य सेवा सुधारणार*

या परिषदेत बोलतांना पालकमंत्री तथा आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, राज्य शासन आरोग्य सेवा सक्षम करण्यासाठी प्रयत्न करीत असून डॉक्टर्सनी यामध्ये योगदान दिले पाहिजे. प्राथमिक आरोग्य केंद्रातील तात्पुरत्या सेवा देणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सेवा नियमित करण्याचा निर्णय घेतला असून मोटारसायकल व सायकल रुग्णवाहिकांच्या माध्यमातून गरजू रुग्णांना आरोग्य सेवा देण्याचे पाऊल उचलले आहे. डॉकटर्सना सुरक्षा मिळावी यासाठी खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी संसदेत खासगी बिल देखील आणले असल्याची माहिती त्यांनी दिली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *