२७ गावांचा २० टक्के करवाढीचा तिढा सुटणार?
सोमवारी आयुक्तांच्या दालनात बैठक
कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिकेत समाविष्ठ असलेल्या २७ गावात २० टक्के करवाढ असल्याने नागरिकांकडून करवाढीस तीव्र विरोध आहे. मात्र या करवाढीचा तिढा सोडविण्यासाठी येत्या सेामवारी ११ फेब्रुवारी रोजी महापालिका आयुक्त गोविंद बोडके यांच्या दालनात नगरसेवकांची बैठक होणार आहे. या बैठकीस करवाढीचा तिढा सुटण्याची शक्यता आहे. २७ गावातील वाढीव कर कमी झाल्यास पालिकेच्या तिजोरीत ६० ते ७० कोटीचे उत्पन्न जमा होणार आहे.
महापालिकेत १ जून २०१५ रोजी २७ गावे समाविष्ट करण्यात आली. यापूर्वी या गावांतील ग्रामपंचायतींकडून मालमत्ता करवसुली केली जात होती. ग्रामपंचायतीची कर कमी होता.२७ गावे महापालिकेत आल्यावर नियमानुसार तीन वर्षे सामान्य कर आकारणी केली जाते. त्यानंतर त्या मालमत्ताधारकांना तीन वर्षांनंतर दरवर्षी २० टक्के करवाढ करण्यात यावी, असा ठराव महापालिकेच्या महासभेत मे २०१८ मध्ये मंजूर करण्यात आला आहे. ही करवाढ जाचक असून ती रद्द करावी तसेच २७ गावांतील नागरिकांना महापालिका योग्य प्रकारे सोयी-सुविधा पुरविल्या जात नाहीत. सोयी-सुविधा न देता करवाढ करणे अयोग्य असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे त्यामुळे वाढीव करवाढीस तीव्र विरोध आहे. मध्यंतरी सेवा नाही तर कर नाही हे आंदोलन कल्याणमध्ये करण्यात आले होते, त्याच धर्तीवर डोंबिवली निवासी भागातील नागरिकांनी करवाढ असलेली मालमत्ता कराची बिले घेणे नाकारली होती. डोंबिवली औद्योगिक निवासी भाग हा २७ गावांच्या हद्दीत समाविष्ट आहे. त्यामुळे त्यांचाही २० टक्के करवाढीस विरोध आहे.
ग्रामपंचायतीच्या काळात इथली करवसुली ग्रामपंचायत अधिनियमाने झाली. गावे पालिकेत समाविष्ट झाल्यानंतर मूल्यवर्धित कर प्रणालीने ही वसुली दोन वर्षांपासून करण्यात येत आहे. गावांतील कर वसुली सात वर्षांत १०० टक्के या समप्रमाणात करायची आहे. सामान्य करात कोणतीही वाढ नाही. अन्य कर दरात सूट देण्याचा पालिकेला अधिकार नाही. कायद्याप्रमाणे सरसकट २० टक्के कर वाढ करून मालमत्ता कराची देयके तयार करण्यात आली आहेत असे पालिकेचे कर प्रमुख विनय कुळकर्णी यांनी स्पष्ट केलय. मात्र वाढीव २० टक्के करवाढ कमी करण्यासाठी स्थायी समिती सभापती दिपेश म्हात्रे यांच्या दालनात बैठक पार पडली सोमवारी पालिका आयुक्तांचया दालनात त्या परिसरातील नगरसेवकांची बैठक होणार आहे त्यामुळे त्या बैठकीत अनुकूल निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (श्रुती देशपांडे -नानल, प्रतिनिधी)