डोंबिवलीतील ” त्या ” रिक्षा थांब्याच्या प्रस्तावाला स्थायी समितीकडून  स्थगिती !

 कल्याण : डोंबिवली पूर्वेतील इंदिरा चौकात बेशिस्त पध्दतीने लावण्यात येणाऱ्या रिक्षा आणि यामुळे होणारी वाहतूक कोंडी हि डोंबिवलीकरांच्या पाचवीलाच पुजलेली आहे. आणि यावरच मात करण्यासाठी राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांनी येथील पाटकर प्लाझा कॉम्प्लेक्सच्या बेसमेंट मध्ये रिक्षा थांबे हलविण्यात यावेत असे आदेश दिले होते. यालाच अनुसरून ब्यारिगेटस खरेदीसाठीचा प्रस्ताव मात्र स्थायी समितीने स्थगित ठेवला आहे.

इंदिरा चौकात गांधीनगर, पी अ‍ॅण्ड टी कॉलनीमध्ये जाणाऱ्या रिक्षा दोन रागांच्या मध्ये लागतात. त्याच वेळी या चौकाच्या दुसऱ्या बाजूला टाटा नाका, गोळवली, कल्याणकडे जाणाऱ्या रिक्षा रस्त्यात उभ्या केलेल्या असतात. वाहनांची या चौकातील घुसमट विचारात घेऊन राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी काही महिन्यांपूर्वी वाहतूक, ‘केडीएमटी’, ‘आरटीओ’, पालिका अधिकाऱ्यांसह डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक भागात संयुक्त दौरा केला होता. त्या वेळी बाजीप्रभू चौकातील ‘केडीएमटी’चा बस थांबा नेहरू रस्त्यावरील उद्यानासमोर हलविण्याचे आदेश दिले होते. एमआयडीसी निवासी, कल्याण,  खोणी भागात जाणाऱ्या ज्या बसची वेळ असेल तीच बस फक्त बाजीप्रभू चौकात आणण्याचे ठरले होते. या दोन्ही चौकांमधील रिक्षाचालकांना चिमणी गल्लीतील पाटकर प्लाझामधील तळाच्या आणि पहिल्या मजल्यावरील वाहनतळावर जागा देण्याचे आदेश पालिका अधिकाऱ्यांना दिले होते. यासाठीच वाहतूक पोलिसांनी  ब्यारिगेटस ची मागणी केली होती. त्यालाच अनुसरून १५० मीटर लांबीचे मुव्हेबल ब्यारिगेटस व पाच माहिती दिशादर्शक या बाबींचा समावेश असून यासाठी अंदाजित पाच लाख रुपये खर्चाला मंजुरीसाठीचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. तर या संदर्भात प्रशासनाला माहिती देण्याचे आदेश सभापती दिपेश म्हात्रे यांनी दिले मात्र प्रशासनाच्या वतीनेहि पुरेशी माहिती दिली गेली नाही. तर सभापती दिपेश म्हात्रे यांनी आपण पाहणी करूया असे सांगितले या संदर्भात भाजपचे नगरसेवक संदीप पुराणिक व निलेश म्हात्रे यांनी आम्ही पाहणी केली आहे आम्ही माहिती देतो असे सांगितले मात्र त्यांनाही काही विशेष बोलण्याची संधी न देता हा विषय स्थगित ठेवण्यात आला.

(श्रुती देशपांडे- नानल- प्रतिनिधी)

**

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *