ओपन जिमला कल्याण डोंबिवलीकरांची पसंती
५० टक्के उद्यानानचा समावेश
डोंबिवली : कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील पालिका उद्यानाला जिमचे स्वरुप देण्यात आले आहे. यंदा पालिकेच्या अर्थसंकल्पात उद्यानात व्यायामशाळा सुरु करण्यासाठी ५० लाखांची तरतूद करण्यात आल्यामुळे आपापल्या प्रभागांतील उद्यानांत व्यायामाचे साहित्य बसविण्यासाठी लोकप्रतिनिधींचे प्रयत्न सुरु झाले आहेत. मागणी वाढल्यामुळे आता अनेक उदयानांमध्ये हे जिम उभारण्याचे काम सुरु झाले आहे.
कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात एकूण ६० उद्याने आहेत. त्यापैकी कल्याणात २० आणि डोंबिवलीत १५ उद्यानांमध्ये या प्रकारची ओपन जिम साकारण्यात आले आहे. सध्या सगळयांमध्ये व्यायामाची विषयी जागरूकता निर्माण झाली आहे. जिममध्ये हजारो रुपये खर्चून व्यायाम करणे प्रत्येकालाच शक्य होत नाही. म्हणूनच पालिका प्रशासनाने उद्यानात व्यायामाचे साहित्य उपलब्ध करुन दिल्याचा दावा केला आहे. आजूबाजूच्या हिरवळी असलेल्या ठिकाणी ही जिम साकारण्यात आली. त्यामुळे यास ग्रीन जिम हे नाव देण्यात आले. ओपन जिम असल्याने याचा वापर सगळयांसाठी खुला राहणार आहे नाशिक महापालिकेतही जिम साकारण्यात आली आहे. त्याच धर्तीवर ही जिम बांधण्यात आली आहे. तसेच मुंबईतील शिवाजी पार्क परिसरातही जिम आहे. ठाणे जिल्ह्यातील ही अशा प्रकारचा पहिलाच प्रयोग करण्यात आला आहे. कल्याणातील काळा तलाव आणि डोंबिवलीतील गांधीनगर मध्ये अशा प्रकारची ओपन जिम साकारण्यात आली होती. त्यानंतर अनेक प्रभागातील बागांमध्ये अशा प्रकारचे जिम उभारण्यासाठी मोठया प्रमाणावर मागणी करण्यात आली आहे.जिम मध्ये ही अशाच प्रकारची पण इलेक्ट्रीकवर चालणारी यंत्रे आहेत. जिम मध्ये नागरिकांसाठी प्रशिक्षक असतात. हे प्रशिक्षक एखादया यंत्राने किती वेळ व्यायाम करावा याबाबत मार्गदशर्न करतात. त्यानुसार ते शरीराला हानिकारक नसते. मात्र बागेत एकही प्रशिक्षक नाही. त्यामुळे अनेक लोक उत्साहाच्या भरात माहिती नसताना या यंत्रानी व्यायाम करतात. यामध्ये लहानांपासुन ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांचाच सहभाग असतो. त्यामुळे एखादा अपघात घडल्यास याची जबाबदारी कोणाची असाच प्रश्न मात्र अनेकांना सतावत आहे. मात्र प्रत्येक यंत्राचा वापर कसा आणि कितीवेळ करावा याची माहिती फलकावर लावण्यात यावी असे मत व्यायाम प्रशिक्षक किरण पाटील यांनी दिली.
सध्या अनेक कल्याण डोंबिवलीतील अनेक बागांमध्ये अशाप्रकारची जिम उभारण्यासाठी मोठया प्रमाणावर प्रस्ताव येत आहे. मात्र हे नगरसेवक निधीच्या माध्यमातुनच हे बसविण्यात येत आहे. ही यंत्र व्यायाम करण्यासाठी तशी सोपी आहे. लोकांनी स्वत;ची काळजी घेऊन व्यायाम करणे गरजेचे आहे.कारण अपघात घडल्यास आमची जबाबदारी नाही. ( संजय जाधव, केडीएमसी, उद्यान अधिक्षक )
प्रतिनिधी : श्रुती देशपांडे- नानल