डम्पिंग ग्राऊंडवरील मुलांनी केलं हॉटेलचं उद्घाटन
कल्याण : कल्याणात साजरा झालेला प्रजासत्ताक दिन खऱ्या अर्थाने काहीसा वेगळा ठरला. डम्पिंग ग्राऊंडवर राहणाऱ्या मुलांच्या हस्ते कल्याण पश्चिमेत हॉटेलचे उद्घाटन करण्यात आले. एकीकडे समाजातील दरी रुंदावत चालल्याची बोलले जात असताना दोघा युवा व्यावसायिकांनी उचलले हे पाऊल निश्चितच धाडसी आणि तितकेच कौतुकास्पद म्हणावे लागेल.
प्रियांक रावल आणि अर्जुन सिंह खाती अशी या दोघा युवा व्यावसायिकांची नावे आहेत. या दोघांनी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत कल्याण पश्चिमेतील वायलेनगर परिसरात एगस्प्लोर नावाचे हॉटेल सुरू केले. या दोघांनी ठरवले असते तर एखादा मोठा सेलिब्रेटी बोलावून आपल्या हॉटेलचे उद्घाटन करणे त्यांना सहज शक्य होते. परंतू पारंपरिक पद्धतीला छेद देऊन त्यांनी वेगळ्या वाटेने जाण्याचा निर्णय घेतला. आणि तो प्रत्यक्षात उतरवलाही. आपल्या नव्या व्यवसायाची सुरुवात नाविन्यतेबरोबरच सामाजिक भान राखून करण्याचा दोघांचाही मानस होता. त्यातून त्यांना कल्याणच्या डम्पिंग ग्राऊंड परिसरातील विद्यार्थ्यांसाठी कार्यरत असलेल्या ‘अनुबंध’ संस्थेबाबत माहिती समजली. आणि प्रियांक आणि अर्जुनने डम्पिंग ग्राऊंडच्या साठेनगर वस्तीत राहणाऱ्या मुलांच्या हस्ते नविन हॉटेलचे उद्घाटन करण्याचे निश्चित केले. त्यानूसार अनुबंध संस्थेच्या माध्यमातून साठेनगर वस्तीतील मुलांच्या हस्ते नव्या दुकानाचे उद्घाटन करण्यात आले. आज एकीकडे समाज एकमेकांपासून दुरावत चालला असताना या नवउद्योजकांनी उचललेले पाऊल नक्कीच अभिमानास्पद आहे.