शैक्षणिक वर्ष संपताना विद्यार्थांच्या हाती गणवेश
दोन कोटी रुपयांच्या प्रस्तावाला मंजुरी
कल्याण : शाळा सुरू होऊन सहा महिने उलटला तरी केडीएमसी शाळांतील विद्यार्थ्यांना अद्याप शालेय साहित्य मिळालेले नाही. दरवर्षीच शैक्षणीक वर्ष सुरु झाल्यावर उशिराने शिक्षण मंडळाला शैक्षणिक साहित्याचे वाटप केले जाते. मात्र यंदातर शिक्षण मंडळाने हद्दच केली असून तब्बल सहा महिन्या नंतर या विद्यार्थ्यांना गणवेश तसेच इतर साहित्य देण्याच्या दोन कोटी रुपयांच्या प्रस्तावाला शुक्रवारी झालेल्या स्थायी समितीच्या सभेत मंजुरी मिळाली. त्यामुळे विद्यार्थ्यांचे अर्धे वर्ष शैक्षणिक साहित्याच्या प्रतीक्षेतच गेले आहे.
कल्याण डोंबिवली महानगर पालिकेची स्थायी समिती सभेत शालेय साहित्य व गणवेश खरेदीचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. आणि याला सर्व सदस्यांनी मंजुरी दिली. वर्षभरापूर्वी केडीएमसीच्या शाळांमधील विद्यार्थी पटसंख्या १० हजाराच्या आसपास होती. आजच्याघडीला ती ९ हजारापर्यंत आली आहे. तर शाळा या ७४ च्या आसपास होत्या. पंरतु विद्यार्थ्यांअभावी यातील ९ शाळा बंद कराव्या लागल्या.विद्यार्थ्यांची घटत चाललेली पटसंख्या ही शिक्षण विभागासाठी डोकेदुखीचाच विषय ठरला आहे. तर महापालिकेच्या शाळा मरणासन्न अवस्थेत असून, या शाळांत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांची आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे या विद्यार्थ्यांना गणवेश, पावसाळी बूट, दप्तर, रेनकोट, कंपास पेट्या, आदी शालेय साहित्यासाठी शाळेवर अवलंबून राहावे लागते. शालेय साहित्य नसल्यामुळे विद्यार्थ्यांना गेल्या वर्षीचे फाटलेले आणि रंग उडालेले युनिफॉर्म वापरावे लागत आहेत. तर ११ नोव्हेंबर २०१८ रोजी झालेल्या स्थायी समितीच्या सभेत बालवाडी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी दोन जोड गणवेश आणि पी.टी ड्रेस, रेनकोट, तसेच इतर शालेय साहित्य साठी निविदा मागविण्यात आल्या होत्या यामध्ये चार निविदा प्राप्त झाल्या होत्या. त्यापैकी युनिव्हर्सल कंपनीला हे कंत्राट देण्यास स्थायी समितीने आज मंजुरी दिली. शाळेच्या पहिल्या दिवशी मुलांना कधीच शालेय साहित्य मिळत नाही. मात्र यंदातर याची हद्दच झाली आहे. आता शैक्षणिक वर्षाची केवळ चार महिनेच राहिलेले असताना आता मंडळाने हा विषय मंजुरीसाठी पटलावर ठेवल्याने आश्चर्यच व्यक्त केले जात आहे. मात्र जरी मंजुरी मिळाली तरी या विद्यार्थांच्या हाती गणवेश आणि शालेय साहित्य यावर्षात तरी मिळेल का असाच प्रश्न उपस्थित होत आहे. मात्र शिक्षण मंडळ तसेच प्रशासनाला याबाबत काहीच गांभीर्यच नसल्याचे पाहावयास मिळत आहे. या संदर्भात शिक्षण अधिकारी जे जे तडवी यांनी सांगितले की, यंदा निविदेच्या प्रक्रियेत खुप वेळ गेला आम्ही मान्य करतो तर यंदाच्याच वर्षी उशीर झाला असल्याचे तडवी यांनी सांगितले. ( श्रुती देशपांडे – नानल, प्रतिनिधी)