डोंबिवलीत इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल धूमधडाक्यात !
डोंबिवली : डोंबिवलीत पहिल्यांदाच आयेाजित केलेल्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलला आजपासून धडाक्यात सुरुवात झाली. जान्हवी मल्टी फाऊंडेशनतर्फे डोंबिवली पश्चिमेच्या वंदे मातरम महाविद्यालयात या फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले आहे. ब्रह्मकुमारी मीडियाचे बी.के.गंगाधर, डॉ.राजकुमर कोल्हे, अश्विन भरडे, डॉ.प्रेरणा कोल्हे यांच्या उपस्थितीत या फेस्टिव्हलचे उद्घाटन करण्यात आले. युवा दिग्दर्शिका जान्हवी राजकुमार कोल्हे यांच्या मूळ संकल्पनेतून हा फिल्म फेस्टिव्हल होत आहे. प्रतिभावान व्यक्तींना एक मंच मिळवून देण्याच्या उद्देशाने हा फेस्टिव्हल आयोजित केल्याचे यावेळी सांगण्यात आले. यामध्ये हिंदी आणि मराठी भाषेबरोबरच भोजपुरी, तामिळ, तेलगू, कन्नड आदी भाषांमधील चित्रपटांचेही स्क्रिनिंग होणार आहे. या फेस्टिव्हलच्या माध्यमातून कधीही पाहायला मिळत नाही अशा दर्जेदार फिचर फिल्म्स आणि शॉर्ट फिल्म्स पाहण्याची संधी उपलब्ध झाली आहे. सामाजिक, शैक्षणिक आदी विविध विषयांवरील फिल्म्सचा त्यात समावेश आहे. विशेष म्हणजे चित्रपट निर्मिती क्षेत्रातील युवा उदयोन्मुख दिग्दर्शक, तंत्रज्ञ, कलाकार यांनी त्यांची निर्मिती केली आहे. मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीतील अनेक दिग्गज दिग्दर्शक, कलाकार, या फेस्टिव्हलला उपस्थित राहणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.
—————————— —