क्रिकेटचे भीष्माचार्य रमाकांत आचरेकर यांचं निधन
मुंबई : मास्टर ब्लास्टर भारतरत्न सचिन तेंडुलकरला घडवणारे गुरू रमाकांत आचरेकर यांचं बुधवारी निधन झालं. ते 87 वर्षांचे होते. पद्मश्री तसंच द्रोणाचार्य पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलं होते.
रमाकांत विठ्ठल आचरेकर यांचा जन्म १९३२ मध्ये झाला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या मालवणमध्ये त्यांचा जन्म झाला होता. त्यांनी १९४३ पासून क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली. मात्र, ते क्रिकेटच्या मैदानावर प्रत्यक्षात उतलेले नाहीत. त्यांनी आपल्या मार्गदर्शनाखाली खेळाडू घडविण्यात रस दाखवला. सचिन तेंडुलकरबरोबरच विनोद कांबळी, प्रविण आमरे, अजित आगरकर आणि चंद्रकांत पंडित अशा अनेक दिग्गज खेळाडूंना रमाकांत आचरेकर यांनी घडवलं. न्यू हिंद स्पोर्ट्स क्लब, यंग महाराष्ट्रा एकादश, गुल मोहर मिल्स आणि मुंबई पोर्ट संघांचं त्यांनी प्रतिनिधित्व केले होतं. पण प्रत्यक्ष क्रिकेट खेळण्यापेक्षा क्रिकेट प्रशिक्षक म्हणून त्यांची कारकिर्द गाजली. दादरला शिवाजी पार्क इथं त्यांनी क्रिकेट क्लबची स्थापना केली. २०१० मध्ये केंद्र सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित केलं. क्रिकेट प्रशिक्षणासाठी १९९० साली त्यांचा मानाच्या द्रोणाचार्य पुरस्कारानं गौरव करण्यात आला होता.