गोवर रूबेला लसीकरण मोहिमेला स्वामी विवेकानंद शाळेत उत्तम प्रतिसाद
डोंबिवली : गोवर रूबेला लसीकरणाच्या मोहिमेस ठाणे जिल्हयात उत्साहाने सुरूवात झाली असून, प्रत्येक शाळेतील विद्याथ्यांना लस दिली जात आहे. शनिवारी सकाळी डोंबिवली पश्चिमेतील स्वामी विवेकानंद विद्यामंदिर अरूणोदय प्राथमिक शाळेत पहिली ते सातवी पर्यंतच्या सर्व विद्याथ्र्यांना गोवर रूबेला लस देण्यात आली. राज्य शासनाच्या वैद्यकिय आरोग्य विभागामार्फत कल्याण डोंबिवली महापालिका वैद्यकिय विभागाच्यावतीने लसीकरण मोहिम राबवली जात असून, ९ महिने ते १५ वर्षे वयोगटातील सर्व बालकांना गोवर रूबेला लस देण्यात येते.
ठाणे जिल्ह्यात आजपर्यंत ४ लाख ४२ हजार ३६८ मुलांना गोवर रुबेला प्रतिबंधात्मक लस देण्यात आली असून, ज्या भागात लसीकरणास प्रतिसाद कमी आहे. तिथे तो वाढविण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत. राज्यात ३० तारखेच्या अहवालानुसार ४८ लाख ८७ हजार ५२७ मुलामुलींना म्हणजेच उद्दिष्टाच्या १६ टक्के लसीकरण झाले आहे. राज्याचे उद्दिष्ट्य ३ कोटी १० लाख ८१ हजार ९७५ इतके आहे तर ठाणे जिल्ह्यासाठी उद्दिष्ट्य २६ लाख ८५ हजार १५ इते उद्दिष्ट्य असून पैकी १६ टक्के पूर्ण झाले आहे.