मराठी भाषेसाठी काम करण्याची फडणीस बाईच्या विश्वस्त संस्थेची घोषणा
ठाण्यातील प्रसिध्द फडणीस बाईच्या 25व्या स्मृतीदिनी चरित्र ग्रंथाचे प्रकाशन व विश्वस्त संस्थेची स्थापना
ठाणे : ठाणे शहरातील प्रख्यात शिक्षण कार्यकर्त्या व समाजसेविका . मंगला मदन फडणीस यांच्या 25व्या स्मृतीदिनानिमित्त स्थापन करण्यात आलेल्या विश्वस्त संस्थेने मराठी भाषेसाठी काम करण्याचे जाहीर केले असून त्याला उपस्थितांनी भरभरुन दाद दिली.
ठाणे शहरात 1949 साली बाल विकास मंदिर शाळेची स्थापना केली. फडणीस बाइंर्ची शाळा म्हणून ती लोकप्रिय झाली. 1993 साली फडणीस बाईचे निधन झाले. त्यांच्या 25 व्या स्मृतीदिनानिमित्त श्रीमती मंगला मदन फडणीस फाउंडेशनची स्थापना व त्यांच्यावरील पुस्तकाचे प्रकाशन ठाण्याच्या आर्य क्रीडा मंडळ सभागृहात गुरुवार दि. 29 नोव्हेंबर रोजी रात्रौ पार पडले. यासमयी माजी प्राचार्या सौ. मंगला सिन्नरकर, जमशेदपूर येथील उद्योजक दिपक पुरंदरे, कोहीनूर ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजच्या संचालिका सौ. माधवी उमेश जोशी, अॅड. लक्ष्मीकांत साटेलकर यांच्यासह फडणीस बाईच्या कन्या, आप्त, शाळेचे असंख्य माजी विद्यार्थी व मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.
या 25व्या स्मृतीदिनाचे आयोजन फडणीस बाईच्या कन्या मृदुला राजे, प्रतिमा बावकर आणि सोनल साटलेकर यांनी केले होते. याप्रसंगी मृदुला राजे लिखित `मंगलदीप’ या जीवन चरित्राचे प्रकाशन तसेच याच पुस्तकाचा कु. प्राची राजे लिखित इंग्रजी अनुवाद `मंगलदीप बायोग्राफी’ चे प्रकाशन प्राचार्या मंगला सिन्नरकर, उद्योजक दिपक पुरंदरे व माधवी जोशी यांच्याहस्ते करण्यात आले. पुस्तकातील प्रसंग, काळ, वेळ, ठिकाण आदी सुसंगत असून हे पुस्तक वाचनिय झाले असल्याचे सौ. मंगला सिन्नरकर यांनी सांगितले. माधवी जोशी यांनी पुढील काळाचा विचार करुन प्राची राजे हिने केलेल्या इंग्रजी अनुवादाचे कौतुक केले.
या कार्यक्रमात ठाणे जिल्ह्यात विविध क्षेत्रात समाजकार्य करणाऱ्या पाच महिलांचा गौरव करण्यात आला. त्यात ज्योत्स्ना प्रधान, अॅड. माधवी नाईक, शिल्पा कशेळकर, शामाश्री भोसले व बर्नाडेट पिमेंन्टो यांचा समावेश होता. त्याप्रमाणे अर्पणा राजे व स्मिता चित्रे यांचा विशेष गौरव करण्यात आला. शाळेच्या माजी विद्यार्थीनीं व फडणीस बाइंर्च्या आप्त डॉ. रणदिवे यांनी अनेक अनुभव कथन केले. फडणीस बाईच्या कन्या मृदुला राजे, प्रतिमा बावकर व सोनल साटेलकर यांनी आपल्या आईच्या अनेक आठवणींना उजाळा दिला. याच कार्यक्रमात सिन्नरसारख्या शहरात राहून देशाविदेशात आपल्या व्यवसायाची पताका फडकविणारे व संपूर्ण जगातून विविध सन्मान मिळविणारे उद्योजक अमित गडकरी यांची मुलाखत डॉ. अद्वेत साटेलकर यांनी घेतली. उद्योजक अमित गडकरी यांचा सन्मान माधवी जोशी यांच्याहस्ते करण्यात आला.
याप्रसंगी सौ. सोनल साटेलकर यांनी आणि त्यांच्या कुटूंबियांनी श्रीमती मंगला मदन फडणीस फाउंडेशन या विश्वस्त संस्थेची घोषणा व नाम फलकाचे अनावरण करण्यात आले. या विश्वस्त संस्थेतर्फे तृतीय पंथीयांसाठी व मराठी भाषेसाठी काम करण्याची घोषण करण्यात आली. फाउंडेशनतर्फे तरुण उद्योजक निखिल वैद्य यांचा सत्कार समीर गुप्ते यांच्याहस्ते तर जर्मन भाषेवर प्रभुत्व मिळवित जर्मनीमध्ये सन्मानित झालेल्या जुईली वैद्य यांचा सत्कार पत्रकार तुषार राजे यांच्याहस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन प्राची राजे यांनी तर आभार अॅड. सोनल साटेलकर यांनी मांडले. या कार्यक्रमास चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती.