आवडत काम जगण्याच साधन बनण हे कलाकाराच सुख – किशोर कदम
ठाणे (प्रतिनिधी) : आपल्याला जे काम आवडत ते जगण्याच साधन बनाव ही कलाकाराच्या दृष्टीने सुखाची बाब असल्याच प्रतिपादन ज्येष्ठ अभिनेते किशोर कदम उर्फ कवी सौमित्र यांनी आज येथे केले.
साहित्य अकादमी आणि मराठी ग्रंथसंग्रहालय, ठाणे यांच्या वतीने सुप्रसिद्ध भारतीय साहित्यिकांवरील डाॅक्युमेंट्री फिल्म शो चे संयुक्त आयोजन करण्यात आले आहे. यावेळी उद्घाटन भाषण करताना किशोर कदम बोलत होते. याप्रसंगी साहित्य अकादमी, मुंबईचे प्रादेशिक सचिव कृष्णा किंबहूने, मराठी ग्रंथसंग्रहालय, ठाणे चे अध्यक्ष विद्याधर वालावलकर, कार्याध्यक्ष विद्याधर ठाणेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
साहित्य अकादमीचे साहित्य वेगवेगळ्या भाषेत आहे. खासकरुन इंग्रजी भाषेतल्या पुस्तकांचा मराठी भाषेत झालेला अनुवादाचे केलेले काम खुपच महत्वाचे आहे. याचबरोबर डाॅक्युमेंट्रीचे साहित्य अकादमीचे कामही महत्वाचे आहे. डाॅक्युमेंट्री लोकांसमोर प्रभावीपणे मांडण्याचे काम करते, सत्य लोकांपर्यंत पोहोचविण्याचे काम करते. आॅन लोकेशन चित्रित करताना, लोकांना प्रश्न विचारताना, जगण्याची, लिहिण्याची, काम करण्याची प्रक्रिया आणि सत्य लोकांपर्यंत पोहोचविण्याचा महत्वाचा भाग म्हणजे डाॅक्युमेंट्री. जाॅर्ज बुश, लादेन यांच्या कुटुंबातील संबंध दर्शविणारी राॅजर बूर यांची डाॅक्युमेंट्रीकडे यादृष्टीने पाहता येईल. हाॅलिवूड मध्ये फीचर्स फिल्म्सच्या बरोबरीने डाॅक्युमेंट्रीला स्थान आहे. भारतात आनंद पटवर्धन यांनी हा प्रयत्न केला आहे. मनोरंजनाच्या पलिकडे जाणारा, सत्य सांगणारा र धो कर्वे यांचा डाॅक्युड्रामा, धर्मवीर भारती, विंदा करंदीकर विजय तेंडुलकर, मधू मंगेश कर्णिक, गिरीश कर्नाड, अरूण कोलटकर, महेश एलकुंचवार, गुलजार, भालचंद्र नेमाडे हे नऊही डाॅक्युमेंट्री हे आपल्या संस्कृतीचे प्रतिनिधीत्व करतात, असे किशोर कदम म्हणाले. आपल्या भाषणानंतर त्यांनी धर्मवीर भारती यांच्या कनुप्रिया या कवितेच अभिवाचन केलं. तत्पूर्वी साहित्य अकादमीच्या पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटन किशोर कदम यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दुर्गेश आकेरकर यांनी केले. या प्रसंगी संस्थेच्या कार्यकारी विश्वस्त वासंती वर्तक तसेच कार्यवाह चांगदेव काळे,अनिल ठाणेकर, महादेव गायकवाड, संजय चुंबळे, तसेच कोकण मराठी साहित्य परिषदेचे महेश केळुस्कर जेष्ठ साहित्यिक अनंत देशमुख, कवी प्रशांत मोरे आदि मान्यवर उपस्थित होते