वेदरशेडवरील कारवाई स्थगित करा- आमदार केळकर
*ठामपाच्या निर्णयाविरोधात मुख्यमंत्र्यांना साकडे*
ठाणे (प्रतिनिधी) – इमारतींचे पावसापासून रक्षण करण्यासाठी उभारण्यात आलेल्या वेदर शेडवर ठाणे महापालिकेने दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यास स्थगिती देण्याची मागणी आ. संजय केळकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. याबाबत त्यांनी नगररचना विभागाच्या प्रधान सचिवांशीही चर्चा केली आहे. त्यामुळे सर्वसामान्य ठाणेकरांना दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
ठाणे महापालिका क्षेत्रातील इमारतींवर पूर्वीपासून पावसापासून संरक्षण करण्यासाठी वेदर शेड उभारण्यात येत आहे. वेदरशेडवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश महापालिका प्रशासनाने काढले आहेत. महापालिकेच्या या निर्णयाला शहरातून तीव्र विरोध होत आहे. यापूर्वी पालिका प्रशासनाने पावसाळ्याच्या चार महिन्यासाठी तात्पुरते शेड उभारण्यास परवानगी दिली आहे. परंतु आर्थिकदृष्ट्या इमारतीतील सर्वसामान्य रहिवाशांना दरवर्षी येणारा खर्च परवडणारा नाही. ठाणे शहरात अनेक जुन्या इमारती आहेत. सर्वसामान्य मध्यमवर्गीय या इमारतीत वास्तव्य करतात. पावसाळ्यात इमारतींना गळती लागते. त्यापासून संरक्षण करण्यासाठी गच्चीवर वेदर शेड उभारण्यात येतात. परंतु प्रशासनाच्या निर्णयामुळे सर्वसामान्य मध्यमवर्गीय ठाणेकरांवर अन्याय होणार असल्याचे आ. केळकर यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.
नागरिकांच्या मागणीनुसार गच्चीवर कायमस्वरुपी वेदरशेड उभारण्याची परवानगी देण्याबाबत महापालिकेने 20 फेब्रुवारी 2014 रोजी ठराव करून हा ठराव नगर विभागाकडे मंजुरीकरिता पाठवला आहे. तब्बल चार वर्षे उलटून गेली तरी या ठरावाबाबत शासनाने ठोस निर्णय घेतला नाही आणि ठाणे पालिका प्रशासनाने याबाबत पाठपुरावा केला नाही. सध्या हे प्रकरण प्रलंबित आहे.त्यामुळे सर्वसामान्य ठाणेकर शासनाच्या या निर्णयाकडे लक्ष ठेऊन आहे.
तूर्त दंडात्मक कारवाईच्या या निर्णयास स्थगिती देण्यात यावी अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे. नगररचना विभागाचे प्रधान सचिव श्री. करीर यांच्याकडे आ. केळकर यांनी बाजू मांडली आहे. चार वर्षांपूर्वी ठामपाने पाठवलेला ठराव मंजूर झाल्यास वेदर शेड नियमित होणार आहेत. त्यामुळे जोपर्यंत मंजुरी मिळत नाही तोपर्यंत दंडात्मक कारवाईचा निर्णय स्थगित ठेवण्यात यावा अशी मागणी आ.केळकर यांनी प्रधान सचिवांकडे केली आहे.