ज्येष्ठ गीतकार आणि संगीतकार यशवंत देव यांच निधन 

ज्येष्ठ गीतकार आणि संगीतकार यशवंत देव यांचे मंगळवारी सकाळी निधन झाले, ते 92 वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील दादर भागातल्या शुश्रूषा रुग्णालयात उपचार सुरू होते.यशवंत देव यांना चिकनगुनिया झाल्याने 10 ऑक्टोबर रोजी शुश्रूषा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते .

यशवंत देव यांचा परिचय

यशवंत देव म्हणजे शब्दप्रधान गायकी. त्यांच्या घरात वडिलांच्या रूपातच गाणे होते. तेच त्यांचे पहिले गुरू. देवांचे वडील विविध वाद्ये वाजवण्यात पटाईत होते पण त्यांतही तबल्यावर त्यांचे जास्त प्रेम होते. त्यांच्याचकडून देवांना तालाचे बाळकडू मिळाले. जी.एन जोशी आणि गजाननराव वाटवे ह्यांच्या शब्दप्रधान गायकीमुळेच यशवंत देव सुगम संगीताकडे वळले.

यशवंत देव यांचा प्रवास गाण्यातून कवितेकडे झाला. आजतागायत अनेक नाटके आणि चित्रपटासाठी गाणी लिहिली, संगीत दिले. त्याचप्रमाणे बालकविता, विडंबन, विनोदी काव्यप्रकारही लिहिले.

आकाशवाणीवर सुगम संगीत विभागात सतारवादक म्हणून त्यांनी कारकीर्द सुरू केली. मुंबई आकाशवाणी केंद्रावर त्यांनी सादर केलेला ‘ भावसरगम ’ हा कार्यक्रम चांगलाच गाजला. त्या द्वारेच, संगीतकार, गायक आणि कवी ही त्यांची ओळख महाराष्ट्राला झाली. शब्दप्रधान गायकीचे उद्गाते, अशी त्यांनी स्वतःची प्रतिमा निर्माण केली. आचार्य रजनीश यांच्या लेखनाचा त्यांनी केलेला भावानुवादही रसिकांना आवडला.

यशवंत देव जसे एक संगीतकार आहेत तसेच ते एक उत्तम गायकही आहेत आणि त्याहीपुढे जाऊन ते एक अतिशय समर्थ असे कवीसुद्धा आहेत. त्यांनी रचलेली कैक गाणी ह्याची साक्ष देतील. जीवनात ही घडी अशीच राहू दे, श्रीरामाचे चरण धरावे दर्शन मात्रे पावन व्हावे, अशी धरा असे गगन कधी दिसेल का?, कोटि कोटि रूपे तूझी कोटी सूर्य चंद्र तारे, तू नजरेने हो म्हटले पण वाचेने वदणार कधी, प्रिया आज माझी नसे साथ द्याया, स्वर आले दुरुनी, जुळल्या सगळ्या त्या आठवणी, अरे देवा तुझी मुले अशी का रे भांडतात, कुणी एकत्र नांदती कुणी दूर दहा हात, अशी ही दोन फुलांची कथा, एक शिवाच्या पदी शोभते एक शवाच्या माथा….अशी एकाहून एक सरस गाणी देवांनी रचलेली आहेत. ह्यातील काही चित्रपटांसाठी, तर काही भावगीत-भक्तिगीत म्हणून रचलेली आहेत. मा.यशवंत देवांनी कैक हिंदी मराठी चित्रपटांना संगीत दिले आहे. तसेच बावनखणी, चारचौघी, सख्खे शेजारी, घनश्याम नयनी आला अशासारख्या जवळपास ३०-४० नाटकांचेही त्यांनी संगीतदिग्दर्शन त्यांनी केले होते. ग.दि. माडगुळकरांचे गीतरामायण जसे सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केले, तसे माडगुळकरांच्या सचिन शंकर बॅले ग्रुपने सादर केलेल्या “कथा ही रामजानकीची” या नृत्यनाटिकेला मा.यशवंत देव यांनी संगीत दिले होते. चिंतनशील कलाकार असणारे मा.यशवंत देव एका फार मोठय़ा सांगीतिक कालखंडाचे साक्षीदार आहेत. स्वत:सोबत अनेकांची कारकीर्द घडताना त्यांनी जवळून पाहिली आहे. १९५१ मध्ये ते सतारवादक म्हणून एच. एम. व्ही.त नोकरीला लागले. लता मंगेशकर, वसंत प्रभू, पी. सावळाराम तसेच आशा भोसले यांची गाणी या काळात पुढे येत होती. हे सर्व देवांना जवळून बघायला मिळाले. एच. एम. व्ही. च्या नोकरीने देवांना अनुभवसमृद्ध केले. मा देव साहेबांनी मोजक्याच चित्रपटांना संगीत दिले. त्याबद्दल त्यांच्या मनात कोणतीही खंत नाही. आपल्याला चित्रपट क्षेत्रात संगीत दिग्दर्शक म्हणून कामे अर्थात ज्या काही चित्रपटांचे संगीत दिग्दर्शन त्यांनी केले त्यातली त्यांची कामगिरी चोख होती. त्याचा आनंदही त्यांना लाभला होता. म्हणूनच ‘जीवनात ही घडी अशीच राहू दे’ (‘कामापुरता मामा’- गीत व संगीत- यशवंत देव) हे लता मंगेशकरांच्या आवाजातलं अजरामर गीत जन्माला आलं. पुलंमुळे ते गीतकार झाले. ‘झालं-गेलं विसरून जा’ या चित्रपटाची गाणी विलक्षण गाजली.

एच. एम. व्ही.ने स्टाफ कमी केल्यामुळे देवांची नोकरी सुटली. दरम्यान, त्यांनी गाण्याचा क्लास सुरू केला. ते स्वत: खऱ्या अर्थाने गायक नाहीत. तरुणपणात फुटलेला आवाज कधीच सांधता आला नाही, असं ते स्वत:च सांगतात. त्यावर मात करण्याचे प्रयत्नही त्यांनी केले. त्यांच्या शिष्यवर्गातील एक नामवंत नाव म्हणजे प्रख्यात पाश्र्वगायिका सुमन कल्याणपूर. (तेव्हाच्या सुमन हेमाडी!) त्यांची देवांच्या संगीत दिग्दर्शनाखालील ‘मधुवंतीच्या सुरासुरातून’, ‘श्रीरामाचे चरण धरावे’, ‘पक्षिणी प्रभाती चारियासी जाये’ ही गाजलेली गाणी त्यांनी गायली.

या गाण्यांना चाली लावताना आपली मन:स्थिती कशी होती, हेही देव विशद करताना म्हणतात, ‘गीताला सूर आपल्या डोक्यात शोधण्यापेक्षा त्या गीताच्या शब्दांतच ते दडलेले असतात हे जाणवलं. शब्दांतच सूर शोधायचे असतात हे सत्य विजेसारखं डोळ्यांसमोर आणि डोक्यात चमकलं!’’ म्हणूनच पुढच्या काळात देवांचं ‘जर कविता चांगली असेल तर त्यात चाल असतेच. मी ती फक्त शोधून काढतो!’ हे वाक्य फार गाजलं. ते नेहमी चांगल्या कवितेच्या शोधात असतात. यातूनच ‘शब्दप्रधान गायकीचे उद्गाते’ हे बिरूद त्यांना बहाल झालं. ‘दिवस तुझे हे फुलायचे’, ‘पाऊस कधीचा पडतो’, ‘तिन्ही लोक आनंदाने’, ‘जीवनात ही घडी’, ‘क्षितिजावर खेळ विजेचा’ अशा अनेक भावगीतांचे / चित्रपट गीतांचे / नाट्यगीतांचे संगीतकार, ‘प्रिया आज माझी’, ‘स्वर आले दुरुनी’, इ. गीतांचे कवी, ‘शब्दप्रधान गायकी’, ‘रियाजाचा कानमंत्र’, ‘कृतज्ञतेच्या सरी’, ‘पत्नीची मुजोरी’ अशा अनेक पुस्तकांचे लेखक मा. यशवंत देव यांना विनम्र श्रद्धांजली!…...(लेखक…संजीव वेलणकर)

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *