पाचव्या-सहाव्या मार्गिकेचे काम जून २०१९ पर्यंत पूर्ण होणार
खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांनी घेतला आढावा
ठाण्यापुढील प्रवाशांच्या सेवेत लवकरच ५० हून अधिक लोकल फेऱ्या
ठाणे – ठाण्यापुढील रेल्वेप्रवाशांच्या दृष्टीने अत्यंत जिव्हाळ्याच्या असलेल्या पाचव्या व सहाव्या रेल्वेमार्गिकांचे काम जलदगतीने व्हावे, यासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी या प्रकल्पातील अडचणी दूर केल्यामुळेच गेल्या दीड–दोन वर्षांत प्रकल्पाचे काम वेगाने सुरू आहे. मुंब्रा रेतीबंदर येथील उड्डाणपुलासह उर्वरित सर्व कामे जून २०१९ पर्यंत पूर्ण होणार असल्याचे एमआरव्हीसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रविवारी स्पष्ट केले. हे काम पूर्ण झाल्यानंतर ठाण्यापुढील प्रवाशांच्या सेवेत ५०हून अधिक अतिरिक्त लोकल फेऱ्या दाखल होणार आहेत, असे खा. डॉ. शिंदे यांनी सांगितले.
मुंब्रा रेतीबंदर येथे पाचव्या व सहाव्या मार्गिकेसाठी उड्डाणपुल करण्यात येणार असून त्याचे पिलर उभारण्याचे काम सुरू आहे. परंतु, दोन दिवसांपूर्वी ओहोटीच्या वेळी येथील जमीन पाण्यासोबत वाहून गेल्यामुळे पाइलिंग रिग मशिन खाडीत पडली, तसेच पाइलिंगच्या कामालाही धोका निर्माण झाला होता. त्यामुळे खा. डॉ. शिंदे यांनी रविवारी सकाळी एमआरव्हीसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह काम सुरू असलेल्या ठिकाणी भेट देऊन पाहाणी केली. सुरक्षिततेची सर्व खबरदारी घेऊन पाइलिंगचे काम करावे, जेणेकरून भविष्यात प्रवाशांचा जीव धोक्यात येणार नाही. आवश्यक असेल तर खाडीकिनारी संरक्षक भिंत बांधावी, जेणेकरून खाडीचे पाणी आत शिरून जमिनीला धोका निर्माण होणार नाही, अशी सूचना शिंदे यांनी यावेळी एमआरव्हीसीचे मुख्य प्रकल्प अधिकारी म्हस्के यांना केली.
खारेगाव येथील रेल्वेच्या टनेलपासून मुंब्रा स्थानकापर्यंत सुमारे सव्वा किलोमीटरचा उन्नत मार्ग उभारण्यात येत असून यात ६५ पिलर असणार आहेत. या पिलर्सची कामे सध्या प्रगतीपथावर आहेत. हा उन्नत मार्ग बांधण्याचा निर्णय रेल्वेने आयत्या वेळी घेतला. मूळ योजनेनुसार जुन्या बोगद्यालगत नवा बोगदा करण्यात येणार होता; परंतु त्यामुळे जुन्या बोगद्याला धोका निर्माण होईल, असे निष्पन्न झाल्यामुळे बोगद्याऐवजी रेतीबंदर मार्गे उन्नत मार्ग उभारून सध्याच्या मुंब्रा स्थानकाच्या पश्चिमेला हा मार्ग जोडण्याचा निर्णय घेण्यात आला. रेतीबंदरची जागा या प्रकल्पाला मिळावी, यासाठी खा. डॉ. शिंदे यांनी ठाणे जिल्हाधिकाऱ्यांकडे सातत्याने पाठपुरावा करून ही जागा उपलब्ध करून दिली. २०० मीटरमध्ये कांदळवनांचा भाग असून त्यासाठी वनविभागाची परवानगीही प्राप्त झाली आहे. उच्च न्यायालयाची मंजुरी मिळताच त्या भागातही कामाला सुरुवात होणार असल्याचे . म्हस्के यांनी सांगितले. याप्रसंगी ठाणे महापालिकेचे उपमहापौर रमाकांत मढवी, माजी नगरसेवक बालाजी काकडे, सुधीर भगत, एमआरव्हीसीचे उपमुख्य अभियंते श्री. कुलकर्णी आदी उपस्थित होते.