कृषी राज्यमंत्र्यांचा पाहणी दौरा दुचाकीवरून ..
बुलडाणा, : खामगांव तालुक्यातील अवर्षणाने नुकसान झालेल्या खरीपातील शेतांची पाहणी करीत असताना जळका भडंग येथून निघाल्यानंतर राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी या भागातील जलाशयांची माहिती घेतली. त्यावेळी त्यांना या भागातील बोरजवळा तलावाची माहिती देण्यात आली. निपाणा येथील शेताची पाहणी केल्यानंतर त्यांनी थेट बोरजवळा तलावाची पाहणी करण्यासाठी जाण्याचे अधिकाऱ्यांना सांगितले. याठिकाणी लवकर पोहोचता यावे यासाठी त्यांनी आपल्या वाहनाची प्रतिक्षा न करता थेट दुचाकीने प्रवास करीत तलाव गाठला. तसेच या दुचाकीने कोरड्याठण्ण पडलेल्या तलावामध्ये बऱ्याच आतमध्ये जावून पाहणी केली. त्यासाठी त्यांनी दुचाकीचा पर्याय निवडला. दुचाकीने पोहोचल्यानंतर संबंधित यंत्रणेचे अधिकारी त्या ठिकाणी पोहोचले. त्यानंतर राज्यमंत्री यांनी तलावाची माहिती घेतली. याप्रसंगी संबंधित यंत्रणेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
अवैधरित्या पाण्याचा उपसा करणाऱ्यांविरूद्ध कडक कारवाई करा : पाणीपुरवठा राज्यमंत्री सदाभाऊ खोत
बुलडाणा : जिल्ह्यामध्ये यंदाच्या पावसाळ्यात कमी पाऊस झाल्यामुळे जिल्ह्यातील अनेक जलाशये तहानलेली आहेत. नदी – नाल्यांना पुर न गेल्यामुळे भूजल पातळी खाली गेलेली आहे. सध्या जो काही पाणीसाठा विहीर, बोअरवेल, बंधारे, तलाव, पाझर तलाव, जलाशये यांच्यामध्ये उपलब्ध आहे. तो काळजीपूर्वक वापरावा, असे आवाहन पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी आज केले.
शेगांव तालुक्यातील लासूरा येथील ग्रामपंचायत कार्यालयाजवळ ग्रामस्थांचा संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला. त्यावेळी राज्यमंत्री सदाभाऊ खोत बोलत होते. यावेळी आमदार ॲड आकाश फुंडकर, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी नरेंद्र नाईक, उपविभागीय अधिकारी मुकेश चव्हाण आदींसह सरपंच व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी ग्रामस्थांच्या अडी – अडचणी जाणून घेण्यात आल्या. त्यानंतर पाणीपुरवठा राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी गावकऱ्यांकडून पाणी पुरवठ्याची परिस्थिती जाणून घेतली. ते म्हणाले, प्रशासकीय यंत्रणेने अवैधरित्या पाणी उपसा करणाऱ्यांविरूद्धा कडक कारवाई करावी. भूजलसाठा सध्या जो आहे, तो संरक्षित ठेवावा. उपसा न करता पाणी भविष्यासाठी जपून ठेवावे. उपलब्ध असलेले भूजल पिण्यासाठी राखून ठेवावे. गावकऱ्यांच्या मागणीनुसार गावाच्या वरच्या बाजूला बंधारा प्रस्तावित करावा. जलयुक्तमध्ये तो घेण्यात यावा. जेणेकरून पाण्याची गावकऱ्यांची समस्या निकाली निघेल.
यावेळी मंडळ अधिकारी, तलाठी व ग्रामसेवक यांना गावाच्या पिण्याच्या पाण्यासाठी पर्यायी व्यव्स्था म्हणून विहीर अधिग्रहण, विंधन विहीर अधिग्रहण, नवीन विहीर अथवा टँकरची उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या. याप्रसंगी ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती
.………