शेतकरीविरोधी कायदे रद्द करण्यासाठी*
*शेतकरी-  वारकऱ्यांनी एकत्र लढावे*
*ह.भ.प.श्यामसुंदर महाराज सोन्नर यांचे आवाहन*
अंबाजोगाई  : शेतकरी हा कोणत्याही एका-जातीचा किंवा धर्माचा नसतो, तसेच वारकरी ही कोणत्याही एका जातीचे किंवा धर्माचे नाहीत. महाराष्ट्रात तर बहुतेक वारकरी हे शेतकरी आहेत. म्हणूनच शेतकऱ्यांच्या मुळावर उठलेले कायदे रद्द करण्यासाठी वारकरी आणि शेतकरी यांनी एकत्रीत लढा द्यावा, असे आवाहन प्रसिद्ध कीर्तनकार आणि संवेदनशील कवी ह.भ.प शामसुंदर महाराज सोन्नर यांनी केले.
 किसानपुत्र आंदोलन या संघटनेचे पाचवे राज्य स्तरीय दोन दिवशीय अधिवेशन शेतकरी नेते अमर हबीब यांच्या प्रयत्नांतून  अंबाजोगाई  येथे आयोजित करण्यात आले आहे. या अधिवेशनासाठी राज्यासह देशभरातूनही प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी संत तुकोबोरायांच्या *मढें झांकुनियां करिती पेरणीl कुणबियाची वाणी लवलाहोll* या अभंगावर शामसुंदर महाराजांचे कीर्तन आयोजित करण्यात आले होते. त्या प्रसंगी महाराज निरूपण करत होते. शेतकरी पेरणी करत असताना कितीही गंभीर प्रसंग असला तरी पेरणीला महत्त्व देतात. कारण त्याला माहीत असते की ओटीला व मुठीला फरक पडत असतो. त्याच प्रमाणे शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनीही शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लढताना तत्परता दाखवली पाहीजे. संत नामदेवांनी ज्या प्रमाणे महाराष्ट्रातच नाहीतर देशभर चळवळ उभी केली त्याच प्रमाणे शेतकऱ्यांनी आपल्या हितासाठी जात , धर्म , पंथ , भाषा इत्यादी भेद विसरून एकसंघ चळवळ उभी करावी म्हणजे नामदेवांनी जसे धार्मिक कर्मकांडाच्या शोषणातून मुक्ती मिळवून दिली .तसे तुम्ही शेतकऱ्यांना व्यापारी , अडते व शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणांपासून मुक्ती मिळवून द्यावी असे आवाहन केले. संत तुकाराम महाराज व छ. संभाजी राजे यांची बदनामी करणारे षडयंत्रकारी हे समाजाचे खरे शत्रू आहेत. याप्रसंगी अभंगाच्या अभ्यासपुर्ण सोडवणूकी बरोबरच शेतकऱ्यांच्या समस्यांवरील कविता सादर करताना श्रोत्यांच्या डोळ्यांत आश्रू दाटून आले होते. शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता आपल्या उन्नतीसाठी संत तुकाराम महाराजांनी सांगितलेल्या सुचनेप्रमाणे स्वहितासाठी जागे राहून तत्परता दाखवावी यातच शहाणपणा आहे असे विवेचन केले.  जागतिक कीर्तीचे पखवाज वादक ह.भ.प. उद्धवबापू आपेगावकर यांनी कीर्तनाची  साथ दिली. याप्रसंगी किसान पुत्र आंदोलन, शेतकरी संघटना , मानव मुक्ती मिशन, महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समिती आदी संघटनांचे मान्यवर कार्यकर्तेही उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *