दिव्यांगांना उपकार नको, संधी हवी ;  डॉ. प्रकाश आमटे यांचे प्रतिपादन
खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने सुमारे १ हजार दिव्यांगांना मदत साहित्याचे विनामूल्य वाटप
कृत्रिम अवयव, ट्रायसिकल, व्हील चेअर, हिअरिंग एड, कॅलिपर, ब्रेल किट, स्मार्ट फोन आदी साहित्याचे वाटप
पालकमंत्री एकनाथ शिंदे, डॉ. मंदाताई आमटे यांची उपस्थिती

कल्याण – बाबा आमटे नेहमी सांगायचे की अपंगांवर उपकार करू नका, त्यांना संधी मिळवून द्या. त्याच भावनेतून हेमलकसामध्ये आम्ही ४५ वर्षे काम करत आहोत आणि आज खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिव्यांग बांधवांना कृत्रिम अवयव, ट्रायसिकल, व्हील चेअर, ब्रेल किट आदी साहित्य देऊन त्यांना स्वतःच्या उत्कर्षाची संधी उपलब्ध करून दिली आहे, असे कौतुकोदगार मॅगसेसे पुरस्कार विजेते ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे यांनी रविवारी येथे काढले.
खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांनी कल्याण लोकसभा मतदार संघातील दिव्यांग बांधवांना शासकीय योजनेतून मदत साहित्याचे वाटप करण्यासाठी कल्याण (पू.) येथील तिसाई देवी माता मंदिर येथे भव्य मेळाव्याचे आयोजन केले होते. त्याला प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. प्रकाश आमटे आणि डॉ. मंदाताई आमटे यांची आशीर्वादरूपी उपस्थिती लाभली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री एकनाथ शिंदे होते.

दिव्यांग बांधवांसाठी केंद्र सरकारच्या अनेक योजना आहेत. वार्षिक अर्थसंकल्पाच्या ५ टक्के रक्कम दिव्यांग कल्याणासाठी खर्च करण्याचे बंधन स्थानिक स्वराज्य संस्थांना आहे. मात्र, या योजना दिव्यांग बांधवांपर्यंत पोहोचत नसल्यामुळे केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून कल्याण लोकसभा मतदारसंघात गेल्यावर्षी मेळावे घेऊन लाभार्थ्यांची यादी निश्चित केली आणि सरकारकडे पाठपुरावा करून निधी मंजूर करून घेतला. अखेर वर्षभराच्या प्रयत्नांना आज फळ मिळाल्यामुळे आज समाधानाचा दिवस आहे, असे खा. डॉ. श्रीकांत शिंदे म्हणाले.


पालकमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, आज केवळ पालकमंत्री म्हणून नव्हे तर पिता म्हणून याठिकाणी उपस्थित आहे, कारण गेले वर्षभर दिव्यांग व्यक्तींना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी किती तळमळीने श्रीकांत पाठपुरावा करत होता, ही मी बघत होतो. दिव्यांग बांधवांना खरोखर संधीची गरज असते आणि संधी मिळाली तर ते काय चमत्कार करू शकतात, हे आपण या कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रगती अंध विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी जी सुंदर गाणी आणि नृत्याचे सादरीकरण केले, त्यावरून बघितले. कृत्रिम पाय असूनही माउंट एव्हरेस्ट चढणारे विनोद रावत यांचीही प्रेरणादायी कहाणी आपण त्यांच्याच तोंडून ऐकली. त्यामुळे प्रत्येक दिव्यांग व्यक्तीला सक्षमपणे आपल्या पायावर उभे करण्यासाठी समाजाने पुढाकार घेणे आवश्यक आहे. डॉ. प्रकाश आमटे आणि डॉ. मंदाताई आमटे यांचाही आशीर्वाद या उपक्रमाला लाभला ही भाग्याची गोष्ट आहे.

जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचेही समयोचित भाषण झाले. याप्रसंगी आमदार डॉ. बालाजी किणीकर, सुभाष भोईर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भिमनवार, जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत बोडारे, ठाणे महापालिका महापौर मीनाक्षी शिंदे, कल्याण-डोंबिवली महापौर विनिता राणे, अंबरनाथच्या नगराध्यक्ष मनीषा वाळेकर, ठाण्याचे उपमहापौर रमाकांत मढवी, कल्याणचे महानगरप्रमुख विजय साळवी, शहरप्रमुख विश्वनाथ भोईर, डोंबिवली शहरप्रमुख राजेश मोरे आदी मान्यवर उपस्थित होते. सुश्रूषा अपंग साहाय्य सेवा संघ, अपंगालय, धर्मवीर दिव्यांग सेना, अपंग सेवा संघ, आमराई, रुग्णमित्र भरत खरे, शरद पवार, निंबाजी वाघ, नूर जहां खान आदींचे सहकार्य या उपक्रमाला लाभले, त्यांचेही खा. डॉ. शिंदे यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *