डोंबिवलीतील बेकायदा सात मजली इमारतीवर हातोडा !
डोंबिवली (प्रतिनिधी) : येथील आजदे गोळवली परिसरातील जागेवर अतिक्रमण करून बेकायदेशीरपणे उभारलेल्या वीर हाईटस या सात मजली इमारतीवर पालिकेने आज हातोडा मारला. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसारच पालिकेने इमारतीतील २४ कुटूंबियांना खाली करून ही कारवाई केली. पालिका आयुक्त गोविंद बोडके यांच्या मार्गदर्शनाखाली आय विभागाचे प्रभाग क्षेत्र अधिकारी शरद पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही धडक कारवाई करण्यात आली. दोन वर्षापूर्वी प्रजापती नामक बिल्डरने वीर हाईटस नावाची सात मजली इमारत उभी केली. त्या इमारतीत एकूण २४ कुटूंब राहतात. सुरेखा भालेराव यांनी आपल्या मालकीच्या जमिनीवर अतिक्रमण करून इमारत उभी केल्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात दावा दाखल केला होता. त्यानुसारच न्यायालयाने सदर इमारत जमिनदोस्त करण्याचे आदेश पालिकेला दिले . न्यायालयाच्या आदेशानुसार पालिकेने २४ कुटूंबियांना इमारत खाली करण्याच्या नोटीसा बजावल्या होत्या. त्यानुसारच गुरूवारी पालिकेने सर्व कुटूंबियांना त्यांच्या सामानासह इमारतीतून बाहेर काढले होते. शुक्रवारी मोठया पोलीस बंदोबस्तात पोकलेन आणि जेसीबीच्व्या साहयायाने इमारतीवर कारवाई केली.