कर्जत ग्रामपंचायत निवडणूक : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वाधिक सरपंच विजयी तर शिवसेनेची पिछाडी !

* राष्ट्रवादी ७, शिवसेना २, शेकाप २ तर काँग्रेस १ जागेवर सरपंच विजयी

कर्जत. ( राहुल देशमुख) : कर्जत विधानसभेची रंगीत तालीम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेनेची जोरदार पीछेहाट झाली असून राष्ट्रवादिला मतदारांनी सूचक इशारा दिला आहे. तर, सत्तेतला भाजप पक्षही कर्जतमध्ये स्थानिक कमकुवत नेतृत्वामुळेच मागे पडल्याचे राजकिय वर्तुळात बोलले जात आहे. या निकालात राष्ट्रवादीचे सर्वाधिक सरपंच निवडून आल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष करत घोषणाबाजी केली.

 

कर्जत तालुक्यातील १३ ग्रामपंचायतीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची जोरदार रणधुमाळी सुरु होती. १३ पैकी कशेळे ग्रामपंचायतीमध्ये सरपंच आणि सदस्यांची बिनविरोध निवड झाली. याबरोबर बीड बुद्रुक सरपंच देखील बिनविरोध निवडण्यात आला. तर, उर्वरित अकरा ग्रामपंचायतीमध्ये मात्र चुरशीची लढत पहायला मिळाली . प्रतिष्ठेच्या मानिवली ग्रामपंचायतीमध्ये शेकापचे तालुका चिटणीस आणि हुतात्मा हिराजी पाटील ग्राम विकास आघाडीचे उमेदवार प्रवीण पाटील यांनी राष्ट्रवादीचे प्रीतम डायरे यांचा ४०० मतांनी पराभव केला . शेलू मध्येही काँग्रेस आणि राष्ट्रवादी परस्परांना भिडले . या ग्रामपंचायतीमध्ये काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष शिवाजी खारीक यांनी रवी मसणे यांचा दणदणीत पराभव करुन विजय संपादन केला. यावेळी आसल ग्रामपंचायत राष्ट्रवादीने सेनेकडून हिसकावून घेतली . तर, सावळा ग्रामपंचायत राष्ट्रवादी काँग्रेसने काबीज केली.वारे या ग्रामपंचायतीच्या निकालाकडेही सर्वांचे लक्ष होते . शेकापचे नेते राम राणे यांचे सुपुत्र योगेश राणे यांनी दणदणीत विजय मिळविला. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुरेश टोकरे यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर झालेली त्यांची ग्रामपंचायत निवडणूक अत्यंत चुरशीची आणि अटीतटीची झालेली पाहावयास मिळाली. या ग्रामपंचातीमध्ये अवघ्या १५ मतांनी शिवसेनेच्या कल्याणी कराळे या विजयी झाल्या . त्यांना १०४९ मते मिळाली तर त्यांच्या प्रतिस्पर्धी अश्विनी कराळे यांना १०३४ मते मिळाली .


१३ ग्रामपंचायतीपैकी सात ग्रामपंचायतीमध्ये राष्ट्रवादीचे सरपंच निवडून आले आहेत. यापैकी दोन जणांची बिनविरोध निवड झाली आहे. शिवसेनेचे दोन सरपंच विजयी झाले आहेत तर, काँग्रेसचा एक सरपंच विजयी झाला. या निवडणुकीच्या मतमोजणीसाठी कर्जत तहसील कार्यालय परिसरात मोठी गर्दी झाली होती. पोलीस बंदोबस्त देखील तैनात होता . मात्र तरीही शेलू ग्राम पंचायतीच्या निकालानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते परस्परांना भिडल्याने काही काळ मोठा तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप केल्याने हा तणाव आटोक्यात आला.
या ग्रामपंचायत निवडणुकीत अनेक ठिकाणी पारंपरिक युती आणि आघाडी सोडून पक्ष एकत्र आल्याचेही चित्र समोर दिसून आले. मानवलीमध्ये शिवसेना -राष्ट्रवादी एकत्र होती. तर, शेकाप – काँग्रेस यांची इथे आघाडी होती. कमीअधिक प्रमाणात असेच चित्र सर्वच ठिकाणी पाहावयास मिळाले.

**

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!