स्वातंत्र्यानंतर पाली धनगरवाड्यात प्रथमच वीज पोहचली
ग्रामस्थांमध्ये आनंदोत्सव
कर्जत (राहुल देशमुख) : रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यामध्ये असलेल्या पोटल ग्रामपंचायत हद्दीतील अतिदुर्गम आणि डोंगराळ भागातील पाली धनगरवाड्यामध्ये स्वातंत्र्यानंतर प्रथमच वीज पोहचली आहे. त्यामुळे त्यांना नव्यानेच प्रकाशमय जीवन जगता येणार असून, येथील तरुणांना शिक्षण, आरोग्य आणि शेतीकडे लक्ष देण्यासाठी या विज पुरवठ्याचा पुरेपुर उपयोग होणार असल्याचे येथील नागरिक रामा खरात यांनी सांगितले. त्यामुळे तेथील धनगर बांधवांनी आनंदोत्सव साजरा करत एकच जल्लोष केला.
सोमवार दिनांक २५ सप्टेंबर रोजी सायंकाळी चार वाजता पाली धनगरवाड्यामध्ये स्वातंत्र्यानंतर प्रथमच पंडित दीनदयाल उपाध्याय ग्रामज्योती योजनेंतर्गत विद्युत पुरवठा नियमित करण्यात आला. याठिकाणी ६३ के व्हीचा ट्रान्सफॉर्मर बसविण्यात आला असून सिंग फेज लाईन खेचण्यासाठी एसटी लाईनचे बारा विद्युत पोल आणि एलटि लाईनचे सात पोल उभे करुन लाईन बसविण्यात आली. या ट्रान्सफॉर्मरचे उद्घाटन शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख तथा सामाजिक कार्यकर्ते बाबु घारे आणि विद्युत वितरण महामंडळाचे अविनाश सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी पोलिस पाटील संतोष कुंभार, तंठामुक्ती अध्यक्ष सुरेश मसणे, शिवाजी कुंभार, नारायण शिंदे, आण्णा खंडागळे, कृष्णा जोशी, विवेक देशमुख, उल्हास देशमुख, भालचंद्र देशमुख आणि धनगर वाड्यातील ग्रामस्थ तसेच महिलावर्गही बहुसंख्येने उपस्थित होत्या. पोटल ग्रामपंचायत हद्दीतील अतिदुर्गम आणि डोंगराळ भाग असलेल्या या पाली धनगरवाड्याचे पाली गावापासूनचे अंतर दोन ते तीन किलोमीटर आहे. येथील लोकसंख्या तीस ते चाळीस आसपास असून येथे धनगर बांधवांची सात घर आहेत. परंपरागत दुग्ध व्यवसाय हा त्यांचा प्रमुख व्यवसाय असून त्याच्यावर त्यांचा उदरनिर्वाह चालतो. देश स्वातंत्र्य झाल्यापासून येथे विजच पोहोचली नसल्याने त्यांचा सर्वांगिण विकासच खुंटला होता. आता विज पुरवठा कायमस्वरूपी होत असल्याने सर्वांगिण विकासाला चालना मिळणार आहे. त्यामुळं ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
प्रतिक्रिया
या धनगरवाड्यामध्ये प्रथमच विद्युत पुरवठा सुरु होत असल्याने येथील नागरिकांमध्ये अत्यंत आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे आम्ही ते वातावरण टिकवून ठेवण्यासाठी आणि वीज पुरवठा कायमस्वरूपी सुरु ठेवण्यासाठी प्रयत्नशील राहू
– (ए. ई. घुले उपकार्यकारी अभियंता – महावितरण कर्जत)
—–