शीळ-कल्याण सहापदरीकरणाला तातडीने सुरुवात

 एकनाथ शिंदे यांचे एमएसआरडीसीला निर्देश 

·  नव्या पत्रीपुलाचे कामही होणार

·  पलावा जंक्शनतळोजा बायपास जंक्शन येथे उड्डाणपुल

·   २१३ कोटी रुपयांचा प्रकल्प

ठाणे, – दुरुस्तीसाठी बंद असलेल्या मुंब्रा बायपासमुळे शीळ-कल्याण रस्त्यावर होत असलेल्या वाहतूक कोंडीतून वाहनचालकांना लवकरच दिलासा मिळणार आहे. शीळ-कल्याण रस्त्याच्या सहापदरीकरणाच्या कामाला तातडीने सुरुवात करण्याचे आदेश सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम) आणि ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी मंत्रालयात झालेल्या बैठकीत एमएसआरडीसीला दिले. या कामासाठी कंत्राटदाराची नेमणूक झाली असून प्रकल्पांतर्गत पत्री पुल येथे नव्या पुलाचे कामही करण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे शीळ-कल्याण रस्त्याप्रमाणेच कल्याण शहरांतर्गत वाहतूक कोंडीचा प्रश्नही निकाली निघणार आहे.

मुंब्रा बायपास बंद असल्यामुळे वाहतुकीचा भार शीळ-कल्याण रस्त्यावर येत असल्यामुळे या रस्त्याच्या सहापदरीकरणाला त्वरित सुरुवात करण्याची मागणी खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांनी बैठकीत केली. २१ किमीच्या या रस्त्याच्या कामातील १६ किमीच्या टप्प्यातील भूसंपादन पूर्ण झाले आहे. त्यामुळे त्वरित काम सुरू करण्याचे आदेश एकनाथ शिंदे यांनी बैठकीत दिले. तसेच,  बैठकीतूनच एमएसईबीएमआयडीसी,बीएसएनएल आदी संबंधित यंत्रणांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी फोनवर चर्चा केली. त्यानुसार युटिलिटी शिफ्टिंगचे काम तातडीने हाती घेण्यात येणार आहे. या बैठकीला एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार आणि अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

काटई टोलनाका येथील रेल्वे उड्डाणपूल उतरताच पलावा येथे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत असल्यामुळे तिथे अंडरपास किंवा उड्डाणपूल बांधण्याची मागणी खा. डॉ. शिंदे यांनी केली होती. तिचाही समावेश या प्रकल्पात करण्यात आला असून तळोजा बायपास जंक्शन येथेही उड्डाणपुल अथवा अंडरपास करण्याची सूचना खा. डॉ. शिंदे यांनी बैठकीत केली. तीही मान्य करण्यात आली आहे.

जुना ब्रिटिशकालीन पत्री पुल धोकादायक झाल्यामुळे त्यावरील वाहतूक थांबवून तो पाडण्याची भूमिका रेल्वे प्रशासनाने घेतल्यामुळे या परिसरातही वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. शीळ-कल्याण सहापदरीकरण प्रकल्पात पत्री पुल येथील नव्या पुलाचाही समावेश असून त्याचेही काम तातडीने सुरू करून सहापदरीकरणाबरोबरच संपवण्याचे नियोजन आहेअसे बैठकीत स्पष्ट करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *