रसिकांना खदखदून हसवणारे :
ज्येष्ठ अभिनेते विजय चव्हाण यांचे निधन 
 
मुंबई : ज्येष्ठ अभिनेते विजय चव्हाण यांचे शुक्रवारी निधन झाले.  मराठी सिनेमा सृष्टीमध्ये चार दशकांहून अधिक काळ विविधरंगी भूमिका करून रसिकांना खदखदून हसायला लावणारा एक चतुरस्त्र नट आपल्यातून हरवला. हा कलाकार मराठी सिनेसृष्टीत येण्यापूर्वी रंगभूमीवर विविध नाटकांमधून रसिकांना मंत्रमुग्ध केलं आहे. मराठी रंगभूमी, छोटा पडदा किंवा मोठ्या पडद्यावरील प्रत्येक भूमिका करताना त्याला न्याय दिला. मोरूची मावशी हे विजय चव्हाण यांच्या कारकिदीर्तील सगळ्यात गाजलेले नाटक. या नाटकात त्यांनी मोरूची मावशी अप्रतिम रंगवली.
विजय चव्हाण यांचा जन्म लालबागमधला. मध्यमवर्गीय कुटुंबातील विजय चव्हाण लालबागमधील प्रसिद्ध भारतमाता चित्रपटगृहाच्या मागच्या बाजूला असलेल्या हाजी कासम चाळीत लहानाचे मोठे झाले. विजय चव्हाण यांनी त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण रुपारेल या कॉलेजमधून पूर्ण केले. कॉलेजमध्ये असताना ते अनेक एकांकिकांमध्ये भाग घेत असत. विजय चव्हाण यांना त्यांची पहिली एकांकिका विजय कदम यांच्यामुळे मिळाली. एकांकिकेमध्ये भाग घेणारा स्पर्धक ऐनवेळी काही कारणास्तव येऊ शकला नव्हता. पण त्या एकांकिकेच्या रंगीत तालमींना विजय चव्हाण नेहमी उपस्थित असायचे. त्यामुळे या एकांकिकेतील सगळे संवाद त्यांना पाठ होते. ही एकांकिका विजय चव्हाण खूप चांगल्याप्रकारे सादर करू शकतील असा विजय कदम यांना विश्वास होता आणि त्यामुळेच त्यांनी विजय चव्हाण यांचे नाव सुचवले. मोरूची मावशी हे विजय चव्हाण यांच्या कारकिदीर्तील सगळ्यात गाजलेले नाटक. या नाटकात त्यांनी मोरूची मावशी अप्रतिम रंगवली. हे नाटक त्यांना लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यामुळे मिळाले होते. खरे तर या नाटकासाठी लक्ष्मीकांत यांना विचारण्यात आले होते. पण हे नाटक प्रायोगिक रंगभूमीवर विजय चव्हाण सादर करत असत आणि हे नाटक लक्ष्मीकांत यांनी पाहिले होते. त्यांनीच या भूमिकेसाठी विजय चव्हाण योग्य असल्याचे निर्मात्यांना सांगितले होते.
 
 चतुरस्त्र नट विजय चव्हाण 
 कलाकारांसोबत काम करताना सहाय्यक कलाकार म्हणून वेगळी छाप पाडणारे विजय चव्हाण सगळ्यांच्या लक्षात राहत. विजय चव्हाण यांनी ‘तू सुखकर्ता’, ‘झिलग्यांची खोली’, ‘सगळे सभ्य पुरूष’, ‘सासरेबुवा जरा जपून’ यासारख्या नाटकांत वेगळ्या भूमिका केल्या. 
‘मोरूची मावशी’ नाटकात साकारलेली मावशी ही आपल्या सगळ्यांच्या लक्षात राहिली. उंच बांधा, रांगड व्यक्तिमत्व असलेला हा कलाकार जेव्हा साडी नेसून रंगमंचावर उभा राहतो तेव्हा तो तितकाच नाजूक वाटतो हे त्यांचे वेगळेपण. रंगभूमीनंतर त्यांनी सिनेसृष्टीतही आपलं वेगळपण दाखवलं. 1985 साली त्यांनी ‘वहिनीची माया’ हा सिनेमा मिळाला. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलं नाही. त्यानंतर ‘घोळात घोळ’, ‘धुमाकूळ’, ‘बलिदान’, ‘शेम टू शेम’, ”माहेरची साडी” यासारख्या वेगवेगळ्या सिनेमांतून त्यांनी वेगवेगळ्या भूमिका साकारल्या. मात्र त्यांच्या जीवनाला कलाटणी मिळाली ती महेश कोठारे यांच्या शुभमंगल सावधान. लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सराफ हे विनोदी नट असताना सहाय्यक कलाकार ही तेवढा दमदार असावा यासाठी विजय चव्हाण यांची निवड झाली. महेश कोठारे यांच्या प्रत्येक सिनेमाचा भाग बनले. तसेच विजय चव्हाण यांची ‘कान्होळे’ ही भूमिका अतिशय आवडली. 
विजय चव्हाण यांनी आतापर्यंत 350-400 चित्रपटांमध्ये काम केले आहे. मोरूची मावशी, श्रीमंत दामोदर पंत ही त्यांची नाटकं प्रचंड गाजली आहेत. त्यांना आतापर्यंत अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. काही महिन्यांपूर्वी त्यांना महाराष्ट्र सरकारच्या व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यावेळी ते व्हिलचेअरवरून पुरस्कार स्वीकारण्यासाठी आलेले पाहून अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला होता. 1985 साली प्रदर्शित झालेल्या वहिनीची माया या चित्रपटाद्वारे त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. झपाटलेला, पछाडलेला, भरत आला परत यांसारख्या अनेक चित्रपटातील त्यांच्या भूमिका प्रचंड गाजल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *