काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुरूदास कामत यांचे निधन

मुम्बई ‬:- काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुरूदास कामत यांचे निधन झाले आहे. दिल्लीतील चाणक्यपुरी येथील प्रिमास रूग्णालयात उपचार सुरू असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ६३ वर्षांचे होते. कॉंग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या ते अत्यंत जवळचे मानले जात. मुंबईमध्ये काँग्रेसची उभारणी करण्यात कामत यांची भूमिका महत्त्वाची होती. त्यांच्या जाण्याने काँग्रेसमधले एक महत्त्वाचे व्यक्तिमत्व गमावले आहे. काँग्रेसच्या सर्व पदांचा राजनीमा देत त्यांनी स्वत:ला कार्यमुक्त केले होते.

विद्यार्थी चळवळीतून राजकारणात प्रवेश

गुरूदास कामत यांचा कर्नाटकातील अंकोला येथे 5 ऑक्टोबर 1954 रोजी जन्म झाला होता. त्यांचे सुरूवातीचे आंयुष्य हे कुर्ल्यातच गेले. तेथेच ते लहानाचे मोठे झाले. कामत यांच्या कुटुंबात कोणीही राजकीय क्षेत्रात नव्हते. विद्यार्थी दशेत असतानाच कामत अतिशय सक्रीय होते. विद्यार्थी चळवळीतूनच 1972मध्ये त्यांनी राजकारणात प्रवेश केला. त्यांनी एनएसयूआयचे अध्यक्षपद देखील भूषवले. त्यानंतर 1984ला ते पहिल्यांदा काँग्रेसकडून लोकसभेवर निवडून गेले.गुरूदास कामत हे 2009 ते 2011मध्ये यूपीए सरकारमध्ये राज्यमंत्री होते. त्यांनी केंद्रीय गृहखातं आणि दूरसंचार मंत्रालयाचा अतिरिक्त भारही सांभाळला होता. मात्र, 2014च्या निवडणुकीत शिवसेनेच्या गजानन कीर्तिकरांकडून त्यांचा पराभव झाला होता.

**

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!