मुद्रांक विक्रेत्यांचा संप महिन्याभरासाठी स्थगित
मुंबई : मुद्रांक विक्रेत्यांच्या विविध मागण्यासंदर्भात बुधवारी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर मुद्रांक विक्रेत्यांनी आपला संप एक महिन्यासाठी स्थगित केला आहे. विक्रेत्यांना मुद्रांक विक्रीपोटी देण्यात येणारे कमिशन 3 टक्क्यांवरून 10 टक्के करण्यासंदर्भात प्रस्ताव तयार करून वित्त विभागाकडे पाठविण्याच्या सूचना दिल्या आहेत अशी माहिती महसूलमंत्री पाटील यांनी दिली. महसूल मंत्री यांच्याबरोबर झालेल्या चर्चेनंतर संघटनेचे अध्यक्ष जयेंद्र खेडकर यांनी संप स्थगित केला असल्याचे जाहीर केले.
मुद्रांक विक्रेत्यांच्या विविध मागण्यासंदर्भात महसूल मंत्रयाच्या दालनात बैठक झाली. चंद्रकांत पाटील म्हणाले की, नागरिकांच्या सोयीसाठी मुद्रांक विभागाने आपल्या सेवा ऑनलाईन केल्या आहेत. यामुळे मुद्रांक विक्रेत्यांनी काळाप्रमाणे बदलून ऑनलाईन सेवा देण्यास सुरू करावे. मुद्रांक नियंत्रक कार्यालयाकडून सुरू करण्यात आलेल्या ई चलन, ई एसबीटीआर यासाठी अधिकृत सेवा पुरवठादार म्हणून मुद्रांक विक्रेत्यांना प्राधान्य देण्याचा निर्णय राज्य शासनाने पूर्वीच केला आहे. मुद्रांक विक्रीसाठी देण्यात येणारे कमिशन वाढविणे अथवा ग्राहकांकडून शुल्क आकारण्यासंदर्भातील प्रस्ताव तातडीने वित्त विभागाकडे पाठविण्याची सूचना मुद्रांक विभागाला दिली आहे. राज्य शासन विक्रेत्यांच्या या मागण्यासंदर्भात सकारात्मक विचार करणार आहे असेही पाटील यांनी सांगितले. यावेळी नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक अनिल कवडे, मुद्रांक विक्रेता व दस्तलेखक संघटनेचे सदस्य उपस्थित होते.