विठूरायाच्या गजरात पर्यावरण रक्षणाचा जागर
डोंबिवली :- आषाढी एकादशी निमित्त डोंबिवलीजवळील भोपर गावात धर्मा चॅरीटेबल ट्रस्ट आणि जे. के. पाटील इंग्लिश स्कूलच्या वतीने गावात विद्यार्थ्यांनी प्रथमच काढलेल्या दिंडीत विठूरायाच्या गजरात पर्यावरण रक्षणाचा जागर करण्यात आला. विद्यार्थी दशेत पर्यावरणाची आवड निर्माण व्हावी याकरिता संचालक गजाजन पाटील यांनी नामी संकल्पना रुजवली. शाळेतील जो विद्यार्थी १ झाड लावेल आणि त्याची जोपासना करेल त्या विद्यार्थ्याला १० गुण अधिक दिले जातील. संचालकाच्या या संकल्पनेचे पालकवर्गचा नव्हे तर गावकरीहि कौतुक करत आहेत. गावातील विठ्ठलरखुमाई मंदिराच्या प्रांगणात विद्यार्थ्यांची दिंडी क्षणभरासाठी स्थिरावल्यावर फुगडी –लेझीम यात दंग झाली.गावातून दिंडी पुढे मारुतीच्या देवळासमोर आल्यावर वारकरी झालेल्या विद्यार्थ्यांनी फेर धरून विठू नामाचा जयजयकार केला. विठू नामाच्या गजरात टाळच्या तालावर हरीश पंढरीनाथ मढवी यांच्या मृदुंगावर पावले टाकत गावातून गेली. संत ज्ञानेश्वर, तुकराम, मुक्ताबाई, बहिणाबाई, जनाबाई, नामदेव यांची वेशभूषा विद्याथ्र्यानी साकारली होती. यावेळी शाळेचे संस्थापक गजाजन पाटील म्हणाले, ज्या माध्यमिक विद्यार्थ्यांना शाळेच्या अभ्यासासोबत पर्यावरण संवर्धनाची आवड निर्माण व्हावी म्हणून शाळेच्या वतीने यंदाच्या वर्षापासून झाडे लावून त्याची जोपासना करणाऱ्या विद्यार्थ्याला परीक्षेत १० गुण ग्रेस म्हणून दिले जाणार आहे.वारकरी संप्रदायाशी जरी मी निगडीत असलो तरी आजवर कधीही वारीला गेलो नाही.अनेक वेळेला असे वाटत होते कि अशी दिंडी काढावी. परंतु कामाचा व्यापात दिंडी काढणे राहून जात होते. परंतु यावर्षी विठ्ठल कृपेने जो जुळून आला. वारीला न जाता वारीत सहभागी झाल्याचा अत्यानंद झाला.यावेळी मुख्याध्यापक मंजुळा पाटील, माजी सरपंच काळू बुवा मढवी, वामनबाबा आश्रमातील श्रीहरी आणि जयहरी हे सेवकहि या दिंडीत सहभागी झाले होते.