कर्जत चारफाटा ते भिसेगाव रेल्वे फाटक रस्त्यावर जीवघेणे खड्डे
कर्जत. (राहुल देशमुख) ; कर्जत चारफाटा ते भिसेगाव रेल्वे फाटकापर्यंतच्या रस्त्यावर जीवघेणे खड्डे पडलेले आहेत. त्यामुळे भिसेगाव, गुंडगे भागातील रहिवाशांना व रेल्वे प्रवाशांना जीव मुठीत धरुन सदर रस्त्यावरुन प्रवास करावा लागत आहे. भिसेगाव, गुंडगे भागातील अनेक रहिवाशी आपल्या लहान मुलांना टु व्हिलरवरुन कर्जत चारफाटा मार्गे कर्जत शहरातील शिशु मंदिर, शारदा मंदिर, केईएस इंग्लिश मिडीयम स्कुल तसेच इतर शाळांमध्ये घेऊन जात असतात. शाळेत नेण्यासाठी एकमेव असलेल्या ह्या रस्त्यावरुन जात असल्यास खड्यात टु व्हिलर आदळुन अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मागील आठवड्यातच कल्याण शहरात एका महिलेचा खड्यात टु व्हिलर आदळुन ट्रक खाली येऊन अपघाती मृत्यु झाला आहे. अशाप्रकारची एखादी दुर्घटना कर्जत शहरात व तालुक्यात घडु नये म्हणुन प्रशासनाने तातडीने रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजवुन नागरीकांचा व लहान विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास थांबवावा. तसेच कर्जत रेल्वे स्थानकातील भिसेगाव दिशेकडील रस्त्यावरही असंख्य खड्डे पडलेले आहेत. भिसेगाव रेल्वे गेटकडील दिशेने हजारो रेल्वे प्रवाशी कर्जत रेल्वे स्थानकात येत असतात. परंतु, पाण्याने भरलेल्या खड्यांमधुन महिला, विद्यार्थी, वृद्ध, अंध, अपंग रेल्वे प्रवाशांना कर्जत रेल्वे स्थानकात येण्याजाण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते. तरी, संबंधित प्रशासनाने सदरील भागातील रस्त्यांवर पडलेले व अपघातास निमंत्रण देणारे सर्व खड्डे युध्दपातळीवर भरावेत जेणेकरून रेल्वे प्रवाशांना व भिसेगाव, गुंडगे दिशेकडील रहिवाशांना आपला जीव धोक्यात टाकुन प्रवास करावा लागणार नाही. मेट्रो, बुलेट येईल तेव्हा येईल पण, रस्त्यांवरील खड्यांमुळे अपघात होण्याची वा अपघातात मृत किंवा जखमी होण्याची वाट न पाहता प्रशासनाने रस्त्यांवर पडलेले खड्डे भरावेत.अशी मागणी होत आहे.