मुंबईत अनधिकृत फेरीवाल्यांवर आता रात्रीही कारवाई होणार

मुंबई : महापालिका क्षेत्रातील अनधिकृत फेरीवाल्यांवर आता रात्री साडेअकरा पर्यंत कारवाई होणार आहे. त्यासाठी महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी २४ विभागात २४ विशेष पथकाची स्थापना करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत.
मुंबईतील अनेक भागांमध्ये विशेषत: रेल्वे स्टेशन जवळील परिसरात महापालिकेच्या कार्यालयीन वेळानंतर काही अनधिकृत खाद्यपदार्थ विक्रेते आणि फेरीवाले रात्री उशीरा पदपथ व रस्त्यांवर अनधिकृत बस्तान बसवित असल्याच्या तक्रारी महापालिकेला प्राप्त झाल्या आहेत. तसेच अनधिकृत फेरीवाल्यांमुळे  पादचा-यांना व वाहनचालकांना अडथळा होत आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत आयुक्तांनी रात्री साडेअकरा पर्यंत ही कारवाई सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. २४ पथकामध्ये १९२ कर्मचा-यांचा समावेश असणार आहे.  दर गुरूवारी या पथकाकडून  प्रत्येक परिमंडळात अचानक व मोठी कारवाई होणार आहे.

गॅस सिलिंडर व रॉकेल आढळल्यास गुन्हा

नागरी सेवा सुविधाविषयक तक्रारींसाठी असणा-या १९१६ या दूरध्वनी क्रमांकाद्वारे प्राप्त होणा-या अतिक्रमण व अनधिकृत फेरीवाल्यासंबंधीच्या तक्रारी, तसेच महापालिकेच्या संकेतस्थळाद्वारे प्राप्त होणा-या याच स्वरुपाच्या तक्रारींबाबत तात्काळ कारवाई होण्याच्या दृष्टीने या तक्रारी नव्याने गठित करण्यात आलेल्या पथकाकडे प्राधान्याने देण्यात येणार आहेत. तसेच अनधिकृत खाद्यपदार्थ विक्रेत्यांकडे गॅस सिलिंडर वा रॉकेल आढळून आल्यास त्याविरोधात पोलिस तक्रार (FIR) दाखल करण्याचीही जबाबदारी या पथकांकडे सोपविण्यात आली आहे, अशी माहिती उपायुक्त रणजीत ढाकणे यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *