नैसर्गिक नाल्याची दिशा बदलली, नाल्याचे पाणी रस्त्यावर शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा
शहापूर : वासिंद शहापुर या मुख्य रस्त्यावरील बोहरी इमारती जवळील नैसर्गिक नाला इमारतीचे बांधकाम करतांना बंद करुन तेथे एक पाईप टाकून नाल्याची दिशा बदलण्यात आल्याने नाल्यातील पाणी थेट रस्त्यावर आल्याने वाहतूकीचा रस्ता संपूर्णपणे पाण्याखाली गेला. या समस्येमुळे येथील वाहतूक बंद पडल्याने नागरिकांचे प्रचंड आतोनात हाल झाले. हा नाला पूर्ववत करण्यात यावा अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा शिवसेना शहापूर उपतालुका प्रमुख किरण जाधव यांनी प्रशासनाला दिलाय.
वासिंद-शहापुर मुख्य रस्त्यावर खातिवली ग्रामपंचायतीच्या हद्दीतील बोहरी इमारती जवळ पाणी साठल्याने येथील वाहतूक पुर्णपणे ठप्प पडली येथून ये-जा करणाऱ्या वृध्द नागरिक महिला लहान शाळकरी विद्यार्थ्यांना या साठलेल्या पाण्यातुन वाट शोधत रस्ता पार करावा लागतोय. यामुळे सर्वांचीच एकच तारांबळ उडाली. हा त्रास केवळ या रस्त्याला लागुन असलेल्या एका इमारत बांधकामव्यावसायिकाने आपले बांधकाम करतांना नैसर्गिक नाल्यावर भराव करुन नाल्याचा मार्ग वळविण्याचा प्रयत्न करुन नाला बंद केला व पाण्याच्या वाहत्या प्रवाहाचा मार्ग वळविल्याने झाल्याचे जाधव यांनी सांगितले. मुख्य रस्त्यापासून नियमानुसार पंधरा मीटर अंतर सोडलेले नाही. दरम्यान सतत सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे हा नाला शनिवारी तुडुंब भरला यातील वाहते पाणी जाण्यास पुरेसी जागा नसल्याने नाल्याचे पाणी थेट रस्त्यावर आले आणि येथे पूरसदृशस्थिती निर्माण झाली आणि नागरिकांना याचा प्रचंड त्रास सहन करावा लागतोय. नागरिकांना भेडसावलेल्या समस्येकडे स्थानिक खातिवली ग्रामपंचायत तहसलीदार मंडळ अधिकारी व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप शिवसेना उपतालुका प्रमुख किरण जाधव यांनी केलाय.
भरपावसाळ्यात नैसर्गिक नाला बंद करुन नागरिकांना नाहक त्रास देणाऱ्या संबंधित बांधकाम व्यावसायिकावर तात्काळ कारवाई करावी. तसेच हा नैसर्गिक नाला संबंधित बांधकाम व्यावसायिकाने कोणाच्या अशिर्वादाने अडवला याची सखोल चौकशी करण्याची मागणी जाधव यांनी केलीय.
———