डोंबिवलीत रिक्षाचालकांची मनमानी भाडेवाढ …
प्रवाशांमध्ये संताप
डोंबिवली ( प्रतिनिधी ) : डोंबिवली पश्चिमेकडील स्टेशनजवळील तुप्ती हॉटेल समोरील मुजोर रिक्षाचालकांनी २ रुपये रिक्षा भाडे वाढविल्याचे फलक लावल्याने प्रवाशी प्रचंड संतापले आहेत. सदर फलक उप्रदेशिक परिवहन विभागाने काढून टाकण्याचे आदेश दिले आहेत. मात्र तरीही रिक्षा चालकाकडून २ रुपये जास्तीचे भाडे आकारले जात आहे. मनमानी भाडे वाढीकडे वाहतूक पोलीस आणि उपप्रादेशिक परिवहन विभागाने कानाडोळा प्रवाशी आणि रिक्षा चालकांमध्ये वाद होत आहेत.
पश्चिमेकडील कुंभारखानपाडा आणि नवापाडा येथे जाणाऱ्या प्रवाश्यांसाठी ८ रुपये रिक्षा भाडे आकारले जात होते. मात्र दोन दिवसांपूर्वी येथील रिक्षाचालकांनी २ रुपये जास्तीचे भाडे आकारले जाईल असे स्वयघोषित फलक लावले होते. याची माहिती उपप्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी संजय ससाणे यांना मिळताच त्यांनी सदर फलक काढून टाकण्याचे आदेश दिले. रिक्षाचालकांनी फलक काढले असले तरी रिक्षा भाडे वाढ सुरुच आहे. मात्र वाढत्या महागाईच्या विचार करून रिक्षा भाडेवाढ झाली पाहिजे असे काही रिक्षाचालकांचे म्हणणे आहे.
कल्याण परिवहन विभागाने डोंबिवलीतील रिक्षा भाडेवाडीची शिफारस गुंडाळून ठेवली आहे. राज्यांतर्गत दर वर्षाच्या मे महिन्यात रिक्षा दरवाढीबाबत धोरण राबविले जाते.यासाठी समितीचे गठण होते. काही वर्षापूर्वी हकिम समिती शासनाच्या वतीने गठीत करण्यात आली होती.या समितीने महागाई निर्देशांक प्रमाणे रिक्षा भाडे वाढ केली होती. त्यानंतर सध्याच्या कथुआ या त्रिसदस्यीय समितीने देखिल हकिम समितीप्रमाणेच भाडे दरवाढीची शिफारस सर्वेक्षण करुन केली होती.याबातचा अहवाल जाहिर करुनसुध्दा परिवहन विभागाने तो अंमलात आणला नाही. दोन वर्ष हा अहवाल धुळ खात पडून आहे.अद्याप कल्याण परिवहन विभागाकडून याची अंमलबजावणी नाही.आता एका वर्षापूर्वी परिवहनने सर्वे करुन शेअर दरपत्रक तयार केले. मात्र तेही अद्याप जाहिर करण्यात आले नाही.त्यामुळे भाडे आकारणी बाबत कोणतीही लेखी सूची नाही.
सीएनजीची भाडेवाढ, इन्शुरनच्या रकमेतील वाढ, प्रेट्रोलची दरवाढ, रिक्षाच्या वाढलेल्या किंमती, रिक्षांची देखभाल, सुट्या भागाची दरवाढ यामुळे रिक्षा भाडे वाढ झाली पाहीजे अशी मागणी रिक्षाचालकांंची आहे. रिक्षांच्या भाडे संदर्भात कोणतेही लेखी टेरीफ कार्ड (भाडे सूची) नसल्याने रिक्षाचालक मनमानी करुन प्रवाशांची लूट करीत असतात हे निखालस खोटे आहे. डोंबिवली ते देशमुख होम याचे भाडे सरासरीप्रमाणे २३ रुपये होते. रिक्षा चालक अवघ्या १५रुपयात प्रवाशास घेऊन जातो. त्यामुळे रिक्षाचालकांकडे परिवहन विभागाकडून प्रमाणबध्द केलेले टेरीफकार्ड असायला हवे. कल्याण परिवहन विभागाकडून सुद्धा सर्वेक्षण होउन डोंबिवलीत भाडेवाढी बाबत सुधारणा झालेली नाही. परिवहन विभागाने अध्यादेशाची अंमलबजावणी न केल्यामुळे प्रवासी व रिक्षचालक यांच्यात गैरसमज असल्याने वाद निर्माण होत असल्याचे लालबावटा रिक्षा चालक मालक युनियनचे अध्यक्ष काळू कोमास्कर यांनी सांगितले.