घाटकोपरमध्ये युपी सरकारचं विमान कोसळलं, पाचजण ठार

मुंबईत : घाटकोपर पश्चिमेकडील जीवदया लेन परिसरात चार्टर्ड विमान कोसळलं. भर वस्तीत, रहिवाशी भागात विमान कोसळल्याने परिसरात भीतीचं वातावरण आहे. या दुर्घटनेत एका पादचाऱ्यासह विमानातील चारही जणांचा मृत्यू झाला. दुपारी दीडच्या सुमारास ही दुर्घटना घडली. दुर्घटनाग्रस्त व्हीटी यूपीझेड, किंग एअर सी-90 हे चार्टर्ड विमान यूपी सरकारचं खासगी विमान होतं. मात्र हे विमान काही दिवसांपूर्वी यूपी सरकारने विकलं होतं. या विमानात पायलट आणि 3 तंत्रज्ञ असे एकूण चार जण होते. यामध्ये दोन महिलांचाही समावेश होता. या चौघांचा आणि एका पादचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. पायलट मारिया कुबेर, को पायलट प्रदीप राजपूत, तंत्रज्ञ सुरभी, मनीष पांडे यांचा मृत्यू झाला. भर वस्तीत विमान कोसळल्याने एकच खळबळ उडाली.  विमान कोसळल्यानंतर मोठा आवाज झाला आणि त्यानंतर आग लागली. आगीचे धूर परिसरात पसरत होते. या परिसरात मोठा आवाज होऊन आगीचे लोट पसरले.  हा आवाज नेमका कसला? नेमकी घटना काय, हे बराच वेळ समजत नव्हतं. या घटनेनंतर परिसरात गोंधळाचं वातावरण होतं. जागृतीनगर जॉगर्स पार्कजवळ बांधकाम सुरु असलेल्या इमारतीनजीक चार्टर्ड विमान कोसळलं.  या घटनेची  माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

जागृतीनगर जॉगर्स पार्कजवळील परिसर अत्यंत दाटीवाटीचा आहे. विमान दुर्घटना ज्याठिकाणी घडली तो परिसर मोकळा आहे. त्यामुळे मारिया यांनी शेवटपर्यंत विमान मोकळ्या जागी उतरवण्यासाठी प्रयत्न केला आणि विमान रहिवासी ठिकाणी कोसळणार नाही याची दक्षता घेतली. विमान एका बांधकाम सुरु असलेल्या इमारतीच्या कम्पाऊंडमध्ये अपघातग्रस्त झालं. विमान अपघातग्रस्त झालेल्या शेजारी मोठा रहिवासी आणि वर्दळीचा परिसर आहे. याशिवाय जवळच एक कॉलेज आहे. विमान रहिवासी परिसरात कोसळलं असतं तर मोठ्या प्रमाणावर जीवितहानी होण्याची शक्यता होती. त्यामुळे महिला पायलटने आपलं कौशल्य आणि प्रसंगावधान राखत मोठी दुर्घटना टाळली आहे. स्थानिक नागरिक या महिला पायलटच्या शौर्याला सलाम केला असून त्याच्या कुशलतेचं कौतुक करत आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *