*ठाणे जिल्ह्यात ७०.८० टक्के मतदान ;जोरदार पावसातही मतदारांचा उत्साह* 

ठाणे : कोकण पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी जिल्ह्यात 70.80  टक्के मतदान झाले आहे. आज सकाळी ७ वाजेपासून ठाणे जिल्ह्यात मतदानास सुरुवात झाली आणि सायंकाळी ५ वाजता मतदान संपले.  पावसाचा वाढता जोर असूनही तरुण पदवीधरच नव्हे तर ज्येष्ठांनी देखील उत्साहाने मतदान केले असे चित्र दिसले. जिल्हाधिकारी डॉ महेंद्र कल्याणकर आणि त्यांच्या पत्नी कलाराणी कल्याणकर यांनी देखील दादोजी कोंडदेव स्टेडीयम येथील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. दुपारी १ वाजेपर्यंत सुमारे ३८.५७ टक्के मतदान झाले होते . दुपारनंतर त्यात वाढ होत गेली आणि ते 70.80 टक्क्यावर मतदान पोहचले असे निवडणूक विभागाने सांगितले. विशेष म्हणजे मतदानात महिलांची संख्या लक्षणीय आढळली.
जिल्ह्यात सकाळी ११ पर्यंत २२ टक्क्यांच्या पुढे मतदान झाले होते. ९ हजार ७७५ मतदारांनी मतदान केले होते.  दुपारी १ पर्यंत ११ हजार २७४ पुरुष आणि ६ हजार ४०६ स्त्री मतदार अशा १७ हजार ६८० मतदारांनी मतदान केले होते.
सायंकाळी 5 नंतर अंतिम मतदानाची आकडेवारी प्राप्त झाली. 20 हजार 384 पुरुष आणि 12 हजार 67 स्त्री मतदार अशा 32 हजार 451 मतदारांनी मतदान केले अशी माहिती सायंकाळी उशिरा देण्यात आली. ठाणे जिल्ह्यात 45 हजार 834 मतदार आहेत.

*मतदारांची गैरसोय टळली*

दादोजी कोंडदेव स्टेडीयम येथील मतदान केंद्राकडे जाणारा रस्ता जोरदार पावसामुळे पाण्याखाली गेल्याने मतदारांची गैरसोय होऊ नये म्हणून तातडीने जेसीबीच्या सहायाने तहसीलदार अधिक पाटील यांनी खडी टाकून तात्पुरता रस्ता तयार केल्याने मतदारांना जाणे येणे सोपे झाले.

मुरबाड, शहापूर, सारख्या ठाण्यापासून दूरवरील तालुक्यातील मतदार देखील सकाळपासून मतदानासाठी बाहेर पडले होते . भिवंडीतील तिन्ही मतदार केंद्रांवर १ वाजेपर्यंत ३६.६६ टक्के मतदान झाले होते. कल्याणमधील ६ मतदान केंद्रांवर दुपारपर्यंत ३७.९७ टक्के मतदान झाले. मुरबाड मध्ये हेच मतदान सुमारे ४२ टक्के झाले होते. उल्हासनगर मधील तिन्ही मतदान केंद्रांवर देखील ४० टक्यांच्या आसपास मतदान झाले होते. अंबरनाथ मध्ये देखील ४० ते ४२ टक्के मतदान झाले. भाईंदर, तुर्भे  येथेही मतदारांनी उत्साह दाखविला.

मतदान केंद्रांवर मतदारांच्या सोयीसाठी मतदार सुविधा केंद्रे स्थापन करण्यात आली असून मतदारांना योग्य ते मार्गदर्शन करण्यात  येत असल्याची माहिती उप जिल्हा निवडणूक अधिकारी फरोग मुकादम यांनी सांगितले. जिल्हाधिकारी डॉ महेंद्र कल्याणकर हे देखील निवडणूक यंत्रणेच्या सातत्याने संपर्कात असून विभागीय आयुक्त डॉ जगदीश पाटील यांना मतदानाच्या प्रगतीची माहिती देत होते.

*ठाण्यात 45 हजार 834 मतदार*

कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूकीसाठी ठाणे जिल्हयातील  ठाणे तालुक्यामध्ये एकूण   26 हजार  567 इतके   मतदार,  कल्याण तालुक्यामध्ये  एकूण 6676 इतके  मतदार,   भिवंडी तालुक्यामध्ये एकूण 3306 इतके मतदार,  शहापूर  तालुक्यामध्ये एकूण  2340 इतके मतदार, मुरबाड   तालुक्यामध्ये   एकूण 1469 इतके मतदार, उल्हासनगर  तालुक्यामध्ये एकूण   1979 इतके मतदार,  अंबरनाथ तालुक्यामध्ये  एकूण 3497  इतकेमतदार असे एकूण 45834 इतके मतदार आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!