नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळास लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव द्या
आगरी कोळी भुमिपूत्र महासंघाची मागणी
खासदार अशोक चव्हाणांनी केली मुख्यमंत्रयाकडे शिफारस
मुंबई : नवी मुंबईत होऊ घातलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळास लोकनेते दि. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ असे नाव देण्यात यावे अशी शिफारस काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केलीय. आगरी कोळी भूमिपूत्र महासंघाच्या शिष्टमंडळाने काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण यांची भेट घेऊन लोकनेते दि बा पाटील यांचे नाव देण्याची मागणी एका निवेदनाद्वारे केली होती. त्याच अनुषंगाने चव्हाण यांनी ही शिफारस केलीय. ठाणे, रायगड, मुंबई आणि नवी मुंबई येथील स्थानिक भूमिपुत्र संघटनांचा महासंघ स्थापन करण्यात आलाय. यावेळी शिष्टमंडळात महासंघाचे ज्येष्ठ नेते संतोष केणे, गजानन पाटील, प्रेमनाथ पाटील, गिरीधर पाटील, गणेश पाटील आदी उपस्थित हेाते.
नवी मुंबई प्रकल्पासाठी इथल्या भूमिपुत्रांच्या न्याय हक्कासाठी लोकनेते दि बा पाटील यांचे योगदान मोठं आहे. लोकनेते दि. बा. पाटील हे पाचवेळा आमदार, दोन वेळा खासदार म्हणून निवडून आले होते. विधीमंडळात विरोधी पक्षनेतेपदही त्यांनी भूषवले आहे. तसेच संयुक्त महाराष्ट्राची चळवळ ते मंडल आयोगाच्या शिफारसीची अंमलबजावणी अशी अनेक पातळयांवर त्यांनी मोलाचे योगदान दिलेले आहे. नवी मुंबई, मुंबई, ठाणे आणि रायगड परिसरातील भूमिपुत्रांसाठी ते देवता समान आहेत. त्यामुळे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळास दि बा पाटील यांचे नाव देऊन त्यांच्या कार्याचा गौरव व्हावा अशी आमची मागणी असल्याचे केणे यांनी सांगितले.