उल्हासनगर – देशात कर्नाटक निवडणुकीच्या निमित्ताने जे सुरु आहे ते पाहिल्यावर या देशात लोकशाही ची अवहेलना होते आहे ही असली लोकशाही काय कामाची असे म्हणत राज्यपालप्रमाणे मुख्यमंत्री ही नेमा आणि निवडणुकीत खर्च होणारा पैसा आणि वेळ वाचवा, देशाला आणि राज्याला शिवशाहीची आवश्यकता आहे असा विश्वास व्यक्त करत या देशात लोकशाहीची अवहेलना होणार असेल तर ही लोकशाही काय कामाची निवडणुका घेऊच नका म्हणजे मोदीना विदेशवारी करण्यात अडचण येणार नाही, राज्यपाल जसे नेमता तसे मुख्यमंत्री नेमा असा जबरदस्त टोला शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज लगावला.
आज गुरुवारी खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या उल्हासनगर येथील जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनानिमित्त उद्धव ठाकरे उल्हासनगर येथे आले होते. गोल मैदान पोलिस चौकीसमोरील मोहन लाइफ स्टाइल येथे खा. डॉ. शिंदे यांचे जनसंपर्क कार्यालय सुरू करण्यात आले असून त्यानिमित्त उल्हासनगरात उद्धव ठाकरे यांची जाहीर सभाही आयोजित करण्यात आली होती.
आज खासदार श्रीकांत शिंदे यांचे काम बघताना चार वर्षांपूर्वीचा तरुण मुलगा आठवतो. तो हाडाचा डॉक्टर असला तरी रक्ताचा शिवसैनिक आहे. एखादी जबाबदारी दिली की ती फत्ते होणार, याची खात्री असते. तसा विश्वास त्याने आपल्या कामातून निर्माण केलाय, असे गौरवोद्गार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी येथे काढले. महापालिका निवडणुकीनंतर ते प्रथमच उल्हासनगर येथे आले होते. खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांचा चार वर्षांचा कार्यअहवाल आणि वेबसाईटचे उदघाटन यावेळी उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले.