अभिनव बँकेच्या दादा-काकांच्या लढाईत, दादांची सरशी !
डोंबिवली : संचालकांच्या राजीनामानाट्यानंतर लागलेल्या अभिनव सहकारी बँकेच्या निवडणूकीत माजी आमदार रमेश पाटील प्रणित अभिनव पॅनेलने एकतर्फी विजय मिळवत आपले वर्चस्व कायम राखले. रमेशदादा पाटील आणि शंकरकाका भोईर यांच्या पॅनेल मध्ये चुरशीची लढत झाली. अखेर दादा-काकांच्या लढाईत, दादांची सरशी झालीय.
एकाच वेळी 10 संचालकांनी राजीनामा दिल्याने ही निवडणूक जाहीर झाली होती. त्यामध्ये विद्यमान अध्यक्ष आणि माजी आमदार रमेश पाटील अभिनव पॅनेलच्या आणि शंकर काका भोईर हे श्री समर्थ पॅनेलच्या माध्यमातून एकमेकांसमोर उभे ठाकले होते. शिवसेनेने शंकर काका भोईर यांच्या श्री समर्थ पॅनेलला पाठिंबा जाहीर केल्याने त्यात आणखीनच चुरस निर्माण झाली होती. मात्र अभिनव पॅनेलने हे आव्हान सहजपणे मोडून काढत सेनेला धूळ चारली. निवडणुकीपूर्वीच एक उमेदवार बिनविरोध निवडून आलेल्या अभिनव पॅनेलने नंतर सर्वच्या सर्व म्हणजे 15 जागांवर आपली विजयी पताका फडकवली.
हे आहेत विजयी उमेदवार
माजी आमदार रमेश पाटील, नगरसेवक प्रकाश भोईर, माजी नगरसेवक दिलीप भोईर, पवन भोईर, विजय पातकर, अनिल पाटील, दिगंबर नेहते, संजय चौधरी, पोपटलाल भंडारी, ऍड. रोहिदास भंडारी, सुशील मनोहर, पौर्णिमा डहाके, उज्वला दुसाने, तुलसीराम चौधरी आणि प्रसाद सांगळे हे उमेदवार दणदणीत मतांनी विजयी झाले.
—–