महापौरपदाचं काऊंटडाऊन : कोण घेणार एक पाऊल मागे !
फडणवीस- शिंदेच्या दरबारात होणार निर्णय
कल्याण ( संतोष गायकवाड ) : कल्याण डोंबिवलीच्या महापौरपदाची निवडणूक अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपलीय. यंदाची महापौरपदाची टर्म ही भाजपची आहे. मात्र शिवसेना महापौरपद सोडण्यास तयार नाही. त्यावरून शिवसेना -भाजपमध्ये चांगलीच जुंपलीय. त्यामुळे हा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दरबात गेलाय. त्यामुळे महापौरपदासाठी भाजप कि शिवसेना, कोण एक पाऊल मागे घेणार याकडं कल्याण डोंबिवलीकरांच लक्ष वेधलय.
कल्याण डोंबिवली महापालिकेची निवडणूक शिवसेना भाजपने स्वबळावर लढवली होती. निवडणूक प्रचारात एकमेकांचे हाडवैरी ठरलेले शिवसेना- भाजपने निवडणूक निकालानंतर सत्तेसाठी गळयात गळे घातले. महापौरपद, उपमहापौरपद आणि स्थायी समिती सभापती अशा वाटणीचा फॉम्र्युला शिवसेना- भाजपने ठरवला होता. त्यानुसार पहिले अडीच वर्षे महापौरपद शिवसेनेला आणि त्यानंतरचे एक वर्ष भाजपला आणि पून्हा दीड वर्षे शिवसेना अश्या वाटाघाटी झाल्या होत्या. शिवसेनेच्या महापौरपदाच्या अडीच वर्षाचा कार्यकाल संपत असल्याने, येत्या ९ मे रोजी महापौर -उपमहापौरपदाची निवडणूक होत आहे. यंदाचे महापौरपद हे भाजपच्या वाटयाला आहे. मात्र भाजपकडे स्थायी समिती सभापतीपद असल्याने महापौरपद भाजपला देण्यास शिवसेनेची नकारात्मक भूमिका आहे. शिवसेनेचे संख्याबळ अधिक असल्याने शिवसेनेचा महापौर होईल अशी भूमिका सेनेतून ठणकावून सांगितली जातेय. तर दुसरीकडे भाजपचाच महापौर होईल असा दावा भाजपच्या पदाधिका-यांनी केलाय. यावरून स्थानिक शिवसेना आणि भाजप पदाधिका-यांमध्ये जुंपलीय. त्यामुळे हा तिढा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दरबारात गेलाय. त्यामुळे फडणवीस आणि शिंदे काय निर्णय घेतात. भाजपला महापौरपद मिळणार का ? कि भाजप एक पाऊल मागे घेणार असेच प्रश्न यानिमित्त उपस्थित होत आहेत.
किती आहे संख्याबळ
शिवसेना ५३, भाजपा ४३, काँग्रेस ४, राष्ट्रवादी २, मनसे ९, बसपा १, एमआयएम १ आणि अपक्ष ९, असे पक्षीय बलाबल आहे.
—
असा होता महापौरपदाचा फॉम्र्युला
शिवसेना — अडीच वर्षे
भाजप — एक वर्ष
शिवसेना — दीड वर्षे