सरकारला नाणारवासियांच्या घरा दारावर नांगर फिरवू देणार नाही : खा. अशोक चव्हाण
नाणार (रत्नागिरी) : नाणार रिफायनरी प्रकल्पाविरोधातील नाणारवासियांच्या आंदोलनाला काँग्रेस पक्षाची सर्वशक्तीनिशी साथ असून सरकारला नाणारवासियांच्या घरा दारावर नांगर फिरवू देणार नाही असा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी आज दिला.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण,अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश यांच्यासह काँग्रेस नेत्यांनी आज नाणार परिसरातील स्थानिकांशी संवाद साधला व जाहीर सभा घेतली या सभेला संबोधित करताना खा. चव्हाण यांनी सरकारवर जोरदार टीका केली ते म्हणाले की, शेतक-यांच्या जमिनी बळकावण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. इंग्रज काळांपेक्षा जास्त दंडेलशाही भाजपच्या सत्ताकाळात सुरु आहे. नाणार वरून सेना भाजपचा वरून किर्तन आतून तमाशा सुरु आहे. शिवसेनेचे मंत्री सुभाष देसाई म्हणतात नाणारच्या भूसंपादनाची अधिसूचना रद्द केली तर मुख्यमंत्री म्हणतात अधिसूचना रद्द करण्याचा अधिकार मंत्र्यांना नाही. अधिसूचना रद्द करायला १० मिनिटे लागतात. सुभाष देसाई घोषणा करून गेले १० दिवस झाले अद्याप अधिसूचना रद्द झाली नाही. शिवसेनेची भूमिका दुटप्पी आहे. सत्ताधारी पक्षाचे लोकच दलाली खाऊन गुजरातच्या लोकांना जमिनी मिळवून देत आहेत. रिफायनरी प्रकल्प आणून कोकण उध्दवस्त करण्याचा प्रयत्न करणा-या या सरकारला उध्दवस्त केल्याशिवाय कोकणी माणूस शांत बसणार नाही असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.
मोदींना सौदी अरेबियात जाऊन कोकणचा सौदा केला: मोहन प्रकाश
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणावर सडकून टीका केली. नरेंद्र मोदींनी सत्तेवर येताच शेतक-यांच्या जमिनी हडप करण्यासाठी पाच वेळा अध्यादेश काढला मात्र काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदींचा डाव हाणून पाडला. अमेरिकन कंपन्यांच्या फायद्यासाठी मोदींनी नोटाबंदी केली. जपानच्या फायद्यासाठी बुलेट ट्रेन आणण्याचा घाट घातला आहे. आता सौदी अरेबियात जाऊन मोदींनी कोकणाच्या जमिनीचा सौदा केला असून तुम्ही पुर्वजांनी जपलेला ह्या निसर्गसंपन्न भूमीच्या रक्षणासाठीचा लढा तीव्र करा काँग्रेस पक्ष तुमच्यासोबत आहे असा विश्वास त्यांनी नाणारवासियांना दिला.
नाणार रिफायनरी विरोधी कृती समितीचे अशोक वालम यांनी प्रकल्पाला ९५ टक्के लोकांचा विरोध असल्याचे सांगितले. या सभेला मार्गदर्शन करताना खा. हुसेन दलवाई, आ. हुस्नबानो खलिफे, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी नाणार प्रकल्पावरून भाजप शिवसेना सरकारवर जोरदार टीका केली.
**