भिमाकोरेगाव प्रकरणी संभाजी भिडेंना ताब्यात घ्या –  रामदास आठवले 

*मागासवर्गीयांच्या विविध मागण्यांसाठी रिपाइंचा बांद्रा येथे प्रचंड मोर्चा आणि राज्यभर  आंदोलन

मुंबई  – कायद्यापेक्षा कोणी मोठा नाही. त्यामुळे भिमाकोरेगाव प्रकरणी जर संभाजी भिडे जबाबदार असतील तर त्यांना मिलिंद एकबोटे प्रमाणे अटक झाली पाहिजे.त्यांच्या शिवप्रतिष्ठान संघटनेची सखोल चौकशी झाली पाहिजे.चौकशीसाठी संभाजी भिडेंना पोलिसांनी त्वरित ताब्यात घेण्यात यावे अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज केली.  बांद्रा येथील उपनगर मुंबई जिल्हा अधिकारी कार्यालयावर रिपाइंच्या वतीने मागासवर्गीयांच्या विविध मागण्यांसाठी प्रचंड मोर्चा काढण्यात आला. म्हाडा कार्यालय ते जिल्हा अधिकारी कार्यालय असा हा मोर्चा  निघाला. आठवलेंच्या नेतृत्वात निघालेल्या मोर्च्याचे  संविधान बंगल्यासमोर सभेत रूपांतर झाले.

अनेकांच्या नाकाला झोबल्या मिरच्या, कारण मी काढला आहे मोर्चा,  त्यांना काढुद्या कोणताही परचा, मात्र मी काढणार बहुजनांच्या प्रश्नावर वेळोवेळी मोर्चा असे सांगत मागासवर्गीयांच्या विविध प्रश्नांवर आपण मंत्री असलो तरी मोर्चे काढणार असे आठवलेंनी जाहीर केले.

राज्यात मंत्री असताना नामांतराच्या प्रश्नावर आपण मोर्चे काढले आहेत. आताही केंद्रात मंत्री असलो तरी मोर्चे काढणार.हा मोर्चा सरकार विरुद्ध नसून सरकारला बळकटी देण्यासाठी आहे. संविधान कोणी बदलू शकत नाही आणि आरक्षण कोणी घालवू शकत नाही जे असं करण्याचा प्रयत्न करतील त्यांना आम्ही घालवू. देशाचे संविधान अत्यंत उंचीवर आहे त्याला हात लावायला गेलेल्यांच्या मुडदे पडलेले आहेत असे सांगत भारतीय संविधान कधीही बदलले जाणार नाही मात्र याबाबत खोटा प्रचार करून सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न करणाऱ्या विरोधकांविरुद्ध हा मोर्चा आहे असे  आठवले म्हणाले.

माझ्या मंत्रीपदामुळे काहींच्या पोटात दुखतोय गोळा त्यांचा माझ्या मंत्रीपदावर आहे डोळा पण माझे आवाहन आहे की समाजात मंत्रीपदे वाढविण्यासाठी काम केले पाहिजे असे आवाहन त्यांनी विरोधकांना केले. दलितांवर अत्याचार होतात हे खरे असून त्याचा मुकाबला केला पाहिजे. दलित अत्याचाराचे खैरलांजी ; खर्डा ; सोनई आदी हत्याकांडाची प्रकरणे काँग्रेस सरकार च्या काळात झाली .त्यामुळे दलित अत्याचार हा राजकीय प्रश्न नसून ती सामाजिक समस्या आहे. समाजप्रबोधनातून प्रश्न सोडविण्यासोबत दलित अत्याचाराचा मुकाबला केला पाहिजे अत्याचाऱ्यांना जेल मध्ये घातले पाहिजे असे आवाहन  रामदास आठवलेंनी केले.,

ऍट्रॉसिटी ऍक्ट च्या संरक्षणासाठी आपण खंबीरपणे सरकार मध्ये आहोत. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाशी सरकार सहमत नाही .सरकार एट्रॉसिटी कायद्याच्या बाजूने आहे.त्यासाठी आरपीआयनेही पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. ऍट्रॉसिटी कायदा आणि आरक्षणाला आपण धक्का लागू देणार नाही. असा विश्वास आठवलेंनी व्यक्त केला. अट्रोसिटी ऍक्ट नुसार गुन्हा नोंदविल्यानंतर पीडित दलितांवर कलम 395 चा खोटे गुन्हे नोंदवू नयेत असा गैरप्रकार करणाऱ्यांवर कारवाई करावी, पदोन्नती मध्ये दलित आदिवासींना आरक्षण मिळण्यासाठी संसदेत कायदा करवा, भीमकोरेगाव हल्ल्यातील साक्षीदार पूजा सकट हिची हत्या झाली असून आरोपींवर खुनाचा गुन्हा नोंदवून त्यांना कठोर शिक्षा करावी आदी मागण्या यावेळी मोर्चा तर्फे करण्यात आली. या मोर्च्यात कल्याण डोंबिवली जिल्हा अध्यक्ष प्रल्हाद जाधव, डोंबिवली शहर अध्यक्ष अंकुश गायकवाड , उल्हासनगर जिल्हा अध्यक्ष भगवान भालेराव आणि महेंद्र गायकवाड या कार्यकर्त्यांसोबत मोर्च्यात मोठ्या संख्येने उपस्थित होते. मोर्च्यांचे यशस्वी आयोजन गौतम सोनवणे यांनी केले. यावेळी रिपाइंचे नेते अविनाश महातेकर, राष्ट्रीय सरचिटणीस मोहनलाल पाटील, महाराष्ट्र्र अध्यक्ष भुपेश थूळकर, सुरेश बारशिंग, काकासाहेब खंबाळकर, सिद्धार्थ कासारे, रमेश गायकवाड, आशाताई लांडगे, विवेक पवार, जगदीश गायकवाड , बाळाराम गायकवाड, हसन शेख, प्रीतिष जळगावकर सुरेश जाधव, ईश्वर धुळे, महेंद्र गायकवाड , राम तायडे, देवेंद्र शेलेकर, प्रकाश जाधव, बाळ गरुड, रतन अस्वारे, सोना कांबळे, सुमीत वजाळे ,साहेबराव सुरवाडे, किसन रोकडे, हरिहर यादव, स्वप्नाली जाधव, अपेक्षा दळवी,रमेश पाईकराव रवी गायकवाड आदी अनेक मान्यवर विचारमंचावर उपस्थित होते.

**

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *