मोदी सरकारमुळे शेतकर्यांच्या डोक्यावर 5 लाख कोटींचे कर्ज वाढले* – खासदार राजू शेट्टी 

नंदूरबार- ” देशात मोदी सरकार सत्तेत येऊन 4 वर्षे झाली, मात्र याच काळात शेतकर्यांचे डोक्यावरील कर्ज 5 लाख कोटीने वाढले”, असल्याची टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी केली. धुळे जिल्हातील धर्मा पाटील यांच्या विखरण गावापासून सुरु झालेली शेतकरी सन्मान्न यात्रा आज नंदुरबार नंदुरबार जिल्ह्यात पोहोचली. जिल्ह्यातील शहादा, शिरपूर तालुक्यातील  बामखेडा,  वडाळी, फेस, वरुळ या गावांत ठिकठिकाणी जाहीर सभा झाल्या, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी ठिकठिकाणी खासदार शेट्टी यांनी स्थानिक प्रश्नांसह देशपातळीवरील  समस्यांचा आढावा घेत भाजप आणि मोदी सरकारवर टीका केलीय.

शेट्टी म्हणाले, देशात जीएसटी नावाचे भूत शेतकर्यांच्या मानगुटीवर बसले आहे. नोटाबंदीने कंंबरडे मोडले, शेतीमालाचे नुकसान झाले, परिणामी शेतकरी उद्ध्वस्त झाला. थापाड्या मोदींनी केले तरी काय? उद्योगपतींच्या हातचे ते बाहुले बनले आहेत. शेतकरी मरणासन्न झालाय, त्याला आधार दिला जात नाही,  म्हणून तो गळफास घेतोय. याची सर्वस्वी जबाबदारी सरकारचीच आहे. शेतकर्यांनो आत्महत्या करू नका, उलट प्रश्न वाढतात, एकाही शेतकर्याने आत्महत्या करू नये, असे आवाहन त्यांनी केले.
देशातला आणि राज्यातला शेतकरी विजय मल्ल्यांप्रमाणे पळपुटा नाही. तो स्वाभिमानी आहे. तो बंड करून प्रस्थापितांची थडगी बांधल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. यावेळी नंदूरबार जिल्ह्यात शेतकरी सन्मान यात्रेचं ठिकठिकाणी जल्लोषी स्वागत करण्यात आले. यावेळी प्रा. डॉ. प्रकाश पोपळे, रविकांत तुपकर, हंसराज वडगुले, रसिकाताई ढगे,राज्य प्रवक्ते अनिल पवार, विभागप्रमुख घनशाम चौधरी, गजानन बंगाळे पाटील, माणिक कदम, पुजाताई मोरे, शर्मिला येवले, अमोल हिप्परगे, रमेश भोजकर, आदी उपस्थित होते.

**

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!