मनपा निवडणुकीच्या मतदानासाठी बुधवारी सार्वजनिक सुट्टी
मुंबई : नांदेड-वाघाळा महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक तसेच बृहन्मुंबई महानगरपालिकेसह इतर महानगरपालिकांमधील पोटनिवडणुकांसाठी मतदारांना मतदानाचा हक्क बजाविण्याकरिता त्या क्षेत्रामध्ये बुधवार दि. 11 ऑक्टोबर 2017 रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक होत आहे. तसेच बृहन्मुंबई महानगरपालिका (प्रभाग क्रमांक 116), पुणे महानगरपालिका (प्रभाग क्रमांक-२१अ), नागपूर महानगरपालिका (प्रभाग क्रमांक-३५अ) आणि कोल्हापूर महानगरपालिका (प्रभाग क्रमांक-११) या महापालिकांमध्ये पोटनिवडणूका होत आहेत. त्यामुळे महानगरपालिकेच्या त्या-त्या प्रभाग क्षेत्रातील केंद्र व राज्य शासनाची सर्व कार्यालये, निमशासकीय कार्यालये, महामंडळे/मंडळे व सार्वजनिक उपक्रमातील अधिकारी/कर्मचारी यांना तसेच निवडणूक असलेल्या क्षेत्राच्या बाहेरील कार्यालयात कामाकरिता असणाऱ्या परंतु त्या क्षेत्रातील मतदार असणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांना देखील सार्वजनिक सुट्टी राहील, असे सामान्य प्रशासन विभागाने एका परिपत्रकान्वये स्पष्ट केले आहे.