अखेर पवारसाहेबांनी भाकरी फिरवलीच !

मुंबई /  संतोष गायकवाड

‘भाकरी फिरवली नाही तर ती करपते’ असे सांगत शरद पवार यांनी अनेकवेळा पक्षातील नेतेमंडळींना धक्के दिले आहेत. त्याचा अनुभव रविवारी सर्वांनाच आलाय.  रविवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी जयंत पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. आगामी निवडणुकीच्या तोंडावर पक्षाची मलिन झालेली प्रतिमा सुधारण्याच्या उद्देशानेच पक्षात फेरबदल करण्यात आले आहेत. त्यामुळे  भाकरी करपण्याआधीच पवारसाहेबांनी ती फिरवलीय.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची राष्ट्रीय सरचिटणीस पदावर वर्णी लावण्यात आलीय. त्यामुळे रिक्त झालेल्या प्रदेशाध्यक्षपदी कोणाची निवड केली जाईल यावर चांगलाच खल सुरू होता. प्रदेशाध्यक्षपदासाठी जयंत पाटील, माथाडी कामगार नेते शशिकांत शिंदे, राजेश टोपे यांची नावे चर्चेत होती. मात्र जयंत पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आलीय. पक्षाला स्वच्छ आणि कोणत्याही वादात न अडकलेला असा चेहरा हवा होता. त्यामुळेच जयंत पाटील यांच्या नावाला पसंती देण्यात आलीय. मागील वेळेसही जयंत पाटील हे प्रदेशाध्यक्षपदाच्या शर्यतीत होते मात्र त्यांचे नाव नेहमीच मागे पडले होते.  लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी अवघा दीड वर्षाचा कालावधी आहे. सर्व राजकीय पक्षांनी त्यादृष्टीने तयारी सुरू केलीय. राष्ट्रवादी काँग्रेसनेही मोर्चेबांधणीस सुरूवात केलीय. पक्षातील फेरबदल हा त्यातील एक भाग ठरलाय.  मागील विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार, सुनील तटकरे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. पक्षाचे वजनदार नेते छगन भुजबळ हे तुरूंगात आहे. एकूणच सगळी परिस्थिती पाहता राष्ट्रवादीची प्रतिमा मलिन झालीय. त्यामुळं पक्षसंघटनेत फेरबदल करून पक्षाची प्रतिमा सुधारणे गरजेचे होते, हे शरद पवार यांच्यासारखा मातब्बर राजकारणी जाणून होते.  त्यामुळेच प्रदेशाध्यक्षपदी स्वच्छ चेह-याचा आणि कोणत्याही भ्रष्टाचाराचे आरोप नसलेले जयंत पाटील यांची निवड करून पवारसाहेबांनी भाकरी फिरवलीय. जयंत पाटील हे कॉंग्रेसचे जेष्ठ नेते स्व. राजारामबापू पाटील यांचे सुपुत्र आहेत. वडीलांच्या निधनानंतर १९८४  साली त्यांनी राजकारणात प्रवेश केला. १९९० साली काँग्रेसच्या तिकिटावर इस्लामपूरमधून आमदार झाले. मात्र त्यानंतर जयंत पाटील यांचा राजकीय आलेख उंचावतच गेला. १९९० ते २०१४ असे सहा वेळा ते आमदार म्हणून निवडून आलेत. १९९९ ला त्यांनी काँग्रेस सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यावेळी   कॉंग्रेस –राष्ट्रावादी आघाडी सरकारच्या काळामध्ये १९९९ ते २००८  पर्यंत अर्थमंत्री, गृहमंत्री आणि  ग्रामविकासमंत्री ही मंत्रीपद भूषवली.  एक अभ्यासू नेता म्हणूनच त्यांची ओळख आहे. आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुका जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखालीच लढवल्या जाणार आहेत.  त्यामुळे पक्ष विस्तार आणि पक्ष बांधणी करतानाच, पक्षाची मलिन झालेली प्रतिमा सुधारण्याचे मोठं आव्हान जयंत पाटलांसमोर असणार आहे. त्यामुळे यात ते किती यशस्वी होतात हा येणारा काळच ठरवणार आहे.

**

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *