काँग्रेस व गांधी-नेहरू कुटुंबाबाबत अपप्रचार करणार्या युट्यूब चॅनेल विरोधात गुन्हे दाखल करा ; विखे पाटील यांची पोलिसात तक्रार*
मुंबई : एका युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून धादांत खोटे व्हीडीओ अपलोड करून काँग्रेसचे दिवंगत पंतप्रधान तसेच प्रमुख नेत्यांबाबत जाणीवपूर्वक अपप्रचार होत असल्याच्या विरोधात विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी लोणी पोलिस ठाण्यात संबंधित व्यक्तींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याबाबत तक्रार केली आहे.
सदर चॅनेलवर अपलोड करण्यात आलेल्या एका व्हीडीओत काँग्रेस पक्ष आणि पक्षातील प्रमुख नेत्यांबाबत धादांत खोटी, निराधार, द्वेषमूलक माहिती प्रसारीत करून त्यांची प्रतीमा मलीन करण्याचा प्रयत्न सुरू आहे. अत्यंत हीन दर्जाची भाषा वापरुन गांधी-नेहरू परिवाराचा अपप्रचार करण्याचा प्रयत्न या चॅनेलने केला असल्याचे विखे पाटील यांनी आपल्या फिर्यादीत म्हटले आहे. माझी मंत्री आण्णासाहेब म्हस्के पाटील, राहाता तालुका कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर गोंदकर, बाजार समितीचे सभापती बापूसाहेब आहेर, सरपंच लक्ष्मण बनसोडे, चेअरमन नंदू राठी, माजी उपसभापती सुभाष विखे, उपसरपंच अनिल विखे, सिनेट सदस्य अनिल विखे, गणेश विखे, शिर्डी नगर पंचायतीचे नगरसेवक याप्रसंगी उपस्थित होते.
विखे पाटील यांच्या तक्रारीवरून लोणी पोलिस ठाण्यात यासंदर्भात भारतीय दंड विधान कलम १५३ अ, २९५ अ अन्वये सामाजिक तेढ निर्माण करणे, धर्म, वंश, जन्मस्थान, निवास आदी कारणांवरुन शत्रुत्व वाढविणे, कोणत्याही धर्माच्या किंवा धार्मिक श्रद्धांचा अवमान करण्याच्या कारणावरून या चॅनेल विरोधात गुन्ह्यांची नोंद केली असल्याचे पोलिस निरीक्षक रणजित गलांडे यांनी सांगितले.
या संदर्भात पत्रकारांशी बोलताना विरोधी पक्षनेते ना.विखे पाटील म्हणाले की, सदर व्हीडीओमध्ये स्व. मोतीलाल नेहरूंपासून ते माजी पंतप्रधान स्व.राजीव गांधी यांच्या सदंर्भात चॅनेलने जाणीवपूर्वक अपप्रचार करून त्यांचा अवमान केल्यामुळे माझ्यासह असंख्य काँग्रेस कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या आहेत. या प्रकारातून देशासाठी अपूर्व योगदान देणार्या थोर नेत्यांची प्रतीमा मलीन करून एकप्रकारे भारताचाही अवमान केला आहे. त्यामुळे हा एक प्रकारे देशद्रोहच ठरतो. त्यामुळेच या चॅनेल विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी त्यांनी केली.
या चॅनेलने सामाजिक आणि धार्मिक तेढ निर्माण करण्याचा केलेला प्रयत्न लक्षात घेऊन हे युट्युब चॅनेल व त्यांचे फेसबुक पेज तातडीने हटविण्यात यावे. पोलिस प्रशासन आणि सरकारने याबाबत गांभिर्य न दाखविल्यास काँग्रेस कार्यकर्ते रस्त्यावर उतरतील, असा इशारा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला.