बदलापुरात  दुसऱ्या दिवशी २०९ किलो गांजा जप्त :  चौघांना बेड्या 

बदलापूरः  दोन दिवसांपूर्वीच येथील बंद कारखान्यातून तब्बल सात कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त केल्यानंतर आज पुन्हा पोलिसांच्या विशेष पथकाने २०९ किलो गांजा हस्तगत केलाय. या प्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केलीय.नरेश अहिरे, कुणाल कडू, सन्नी परदेशी आणि अमोल घनघाव अशी अटक करण्यात आलेल्या चौघांची नावे आहेत. मात्र अंमली पदार्थ्यांच्या तस्करीचे धागेदोरे बदलापूर शहरात आढळून आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
दोन दिवसांपूर्वी अंबोली पोलिसांनी अटक केलेल्या एका व्यक्तीच्या माध्यमातून बदलापूरातील श्री शारदा केमिकल्स या बंद कंपनीवर छापा टाकला होता.  यावेळी सात कोटींचा द्रवरूप एमडी (मेफेड्रॉन) साठा जप्त करण्यात आला होता.  मालकासह दोघांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर दोनच दिवसात पोलिसांच्या कल्याण पूर्व प्रादेशिक विभागाच्या विशेष पथकाने बदलापूर पश्चिम पोलिसांच्या मदतीने बदलापूरातून गांजा विक्री आणि साठा करणाऱ्या एका टोळीला अटक केली आहे. त्यांच्याकडून २०९ किलो ८०० ग्राम वजनाच्या गांजासह एक इनोव्हा व एक क्रेटा गाडी असा एकूण ६८ लाख ४४ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

कल्याण आणि उल्हासनगर परिमंडळातील अवैध आणि अनैतिक धंद्यांवर कारवाई करण्यासाठी अपर पोलिस आयुक्त डॉ प्रताप दिघावकर यांनी विशेष पथकाची नेमणूक केली होती. त्या पथकातील प्रमुख सहाय्यक पोलिस निरिक्षक अजित जाधव यांना बदलापूर पश्चिमेतील बस स्थानकावर गांज्याची विक्री करण्यासाठी एकजण येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार सहायक पोलिस निरिक्षक अजित जाधव यांनी पोलीस उपनिरीक्षक दीपक जाधव आणि बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्याचे  वरिष्ठ पोलिस निरिक्षक जितेंद्र आगरकर यांच्या मदतीने बस स्थानक परिसरात सापळा रचला होता. त्या ठिकाणी पोलिसांनी नरेश अहिरे या तरूणाला ३० हजार ७०० रूपये किमतीच्या २ किलो २०० ग्रॅम वजनाचा गांज्यासह अटक केली. त्याची चौकशी केली असता यापेक्षा अधिकचा साठा बदलापूरातच असल्याचे त्याने सांगितले. बदलापूर जवळील ढोके दापिवली येथील राजाराम कडू यांच्या फार्म हाऊसमध्ये हा गांजाचा साठा असल्याची माहिती त्याने दिली. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकला असता तेथे हा २०७ किलो ६०० ग्रॅम वजनाचा ३१ लाख १४ हजार रुपये किमतीचा गांजा मिळून आला. पोलिसांनी हा साठा जप्त केला. तसेच या फार्महाऊसजवळ उभ्या असलेल्या दोन चारचाकी वाहनांमधूनही गांजा मिळून आल्याने ३७ लाख रुपये किमतीच्या या गाड्याही जप्त करण्यात आल्या. यावेळी फार्म हाऊसवर असलेल्या कुणाल कडू, सन्नी परदेशी आणि अमोल घनघाव या तिघांना अटक करण्यात आली असून राजाराम कडू मात्र फरार झाला आहे. यातील वाहनांच्या मालकांचा शोध सुरू असून अटक आरोपी अन्य कोणत्या प्रकरणात सामिल होते का याचाही तपास सुरू असल्याची माहिती अपर पोलिस आयुक्त डॉ प्रताप दिघावकर यांनी दिली आहे. याप्रकरणी बदलापूर पश्चिम पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र आगरकर करीत आहेत. मात्र

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *