डोंबिवलीकर मतदारांनी २५ एप्रिलपर्यंत रंगीत छायाचित्रे द्यावीत ; अन्यथा मतदार यादीतून नावे वगळली जातील
ठाणे : अचूक आणि परिपूर्ण मतदार याद्या तयार करण्याचे काम वेगाने सुरु असून १४३ डोंबिवली विधानसभा मतदारसंघातील मतदारांनी २५ एप्रिलपर्यंत आपली रंगीत छायाचित्रे सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
२५ एप्रिल पर्यंत मतदारांनी रंगीत छायाचित्रे जमा न केल्यास असे मतदार स्थलांतरीत म्हणून गणना करून लोकप्रतिनिधित्व अधिनियम १९५० च्या कलम २२ अन्वये त्यांचे नाव मतदार यादीतून वगळण्याची कायदेशीर कारवाई केली जाईल.
डोंबिवली मतदार संघाचे मतदार नोंदणी अधिकारी पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार या मतदार संघात मतदारांची रंगीत छायाचित्रे गोळा करण्याचे काम मोठ्या प्रमाणावर सुरु असून बूथ पातळीवरील अधिकाऱ्यांना या कामी सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले आहे.
या विशेष कार्यक्रमाबरोबरच जे मतदार स्थलांतरित आहेत तसेच मयत व दुबार नावे आहेत त्यांच्या बाबतीत देखील कार्यवाही सुरु आहे. याबाबत काही शंका असल्यास १४३ डोंबिवली विधानसभा मतदार संघ मध्यवर्ती कार्यालय, पू. भा. भावे सभागृह, तळमजला, महात्मा गांधी रोड, डोंबिवली पश्चिम येथे संपर्क साधावा.