मुंबई महापालिकेने गाठला मालमत्ता कर वसुलीचा ५ हजार कोंटीचा टप्पा  : महापालिकेच्या इतिहासातील विक्रमी वसुली 

करनिर्धारक व संकलक विभागाचा सन्मान

मुंबई : गेल्या आर्थिक वर्षात  मालमत्ता करापोटी तब्बल ५ हजार १३२ कोटी रूपये मुंबई महापालिकेच्या तिजोरीत जमा झालेत. पालिकेच्या इतिहासात प्रथम विक्रमी वसुली झालीय. त्यामुळे महापालिकेच्या करनिर्धारण व संकलन खात्याचे उप करनिर्धारक व संकलक सर्वश्री प्रल्हाद कलकोटी व अरविंद चव्हाण या दोन कार्यतत्पर अधिका-यांचा ‘एप्रिल २०१८’ या ‘महिन्याचे मानकरी’ म्हणून महापालिका आयुक्त अजोय मेहता यांच्या हस्ते सन्मान करण्यात आलाय. या सत्कार प्रसंगी अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) डॉ. संजय मुखर्जी, अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) आय. ए. कुंदन, अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) विजय सिंघल, अतिरिक्त आयुक्त (शहर)आबासाहेब ज-हाड, उपायुक्त (आयुक्त कार्यालय). रमेश पवार, सहाय्यक आयुक्त (करनिर्धारण व संकलक) देवीदास क्षीरसागर यांच्यासह महापालिकेचे सर्व संबंधित उपायुक्त, सहाय्यक आयुक्त व विभाग प्रमुख आदी उपस्थित होते.

मालमत्ता कर हा पालिकेच्या उत्पन्नातील महत्वाचा स्त्रोत समजला जातो. आर्थिक वर्ष २०१७-१८ मध्ये महापालिकेच्या करनिरर्धारण व संकलन खात्याला ५ हजार ४०२ कोटींचे उद्दिष्ट देण्यात आले होते. यापैकी सप्टेंबर २०१७ अखेरपर्यंत केवळ २ हजार ८८ कोटी एवढीच रक्कम महापालिकेच्या तिजोरीत जमा झाली होती. त्यामुळे करनिर्धारण खात्याकडून उद्दीष्ट गाठले जाईल का अशी शंका व्यक्त करण्यात येत होती. मात्र मालमत्ता कराची योग्य ती वसुली व्हावी यासाठी करनिर्धारण व संकलन खात्याने विविध स्तरीय प्रयत्न व जनजागृती केली होती. मालमत्ता कर भरण्यास टाळाटाळ करणा-यांवर केलेली कारवाई याचाही चांगला परिणाम दिसून आलाय.

गतवर्षीपेक्षा २८५ कोटींनी अधिक वसुली
डिसेंबर २०१८ अखेरपर्यंत ३ हजार ६६ कोटी, तर फेब्रुवारी अखेरपर्यंत ३ हजार ७४६ कोटी महापालिकेच्या तिजोरीत जमा झाले होते. त्यानंतर मार्च महिन्यात १ हजार ३८६ कोटी रुपये मालमत्ता करापोटी जमा झालेत. गेल्या वर्षीच्या मालमत्ता कर वसुलीपेक्षा २८५ कोटींनी अधिक आहेत. आर्थिक वर्ष २०१६-१७ मध्ये ४ हजार ८४७ कोटी रुपये एवढी मालमत्ता कर वसुली झाली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *