घाटकोपरच्या सुंदरबाग वसाहतीत दुषीत पाण्याचा पुरवठा
घाटकोपर ( निलेश मोरे ) मुंबई उपनगरातील घाटकोपरच्या असल्फा येथील सुंदरबाग वसाहतीत गेल्या नऊ माहिन्यापासून नळातून दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याने इथल्या रहिवाशांना विविध आजारांचा सामना करावा लागत आहे. जवळपास ५० रहिवासी पाण्यामुळे आजारी पडले आहेत अशी माहिती स्थानिक रहिवाशी व तक्रारदार अविनाश जोशी यांनी दिली. दुषीत पाण्यांसदर्भात पालिकेच्या एल वॉर्डाकडे तक्रारी करूनही ठोस कार्यवाही होत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
असल्फा व्हिलेज , नेताजी पालकर मार्गावरील असलेल्या सुंदरबाग झोपडपट्टीत एकूण १५० घरे असून, ७५० कुटुंब राहतात . इथल्या वसाहतीला पाणी पुरवठा करणा-या पाईप लाईन या ३५ वर्ष जुन्या झाल्या आहेत. तसेच काही पाईप लाईन बेकायदेशीरपणे बसवण्यात आल्या आहेत. या पाईपलाईनमधून दुषीत पाणी पुरवठा होत असल्याची तक्रार स्थानिक रहिवाशी अविनाश जोशी यांनी पालिकेच्या एल वॉर्डाकडे केली आहे. पालिकेचे अधिकारी पोपटराव यांनी दोनवेळा या वसाहतीला भेट देऊन बेकायदेशीर पाईप लाईनला लाकडी खुंटे लावून बंद केले आहेत. मात्र खुंटे पाण्यामुळे फार काळ टिकत नसल्याने त्यातून पुन्हा दुषीत पाणी मिश्रीत होत आहे. त्या पाण्याला उग्र स्वरूपाचा वास येत आहे. दुषीत पाणी पिता येत नसल्याने रहिवाशी बिस्लेरीचे पाणी विकत आणत असल्याचे तक्रारदार अविनाश जोशी यांनी सांगितले. या दूषित पाण्यामुळे जोशी यांच्या कुटुंबातील त्यांचे बंधू दिपक जोशी, ओमकार जोशी, मानसी जोशी यांना या पाण्यामुळे वायरल ताप आल्याने त्यांना घाटकोपरच्या मुक्ताबाई रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तसेच या वसाहतीतील जवळपास ५० हुन अधिक रहिवाशी या पाण्यामुळे आजारी पडल्याचे जोशी यांनी सांगितले .