नांदेडमध्ये शिवसेनेचे काँग्रेसशी संधान : मुख्यमंत्रयाची जोरदार टीका
नांदेड : नांदेडमध्ये शिवसेना जिंकून येण्यासाठी लढत नाही तर भाजपला पराभूत करण्यासाठी लढतेय. इथली शिवसेना ही काँग्रेसची बी टीम आहे. अशोक चव्हाणांच्या इशा-यावर नाचणारी आहे. त्यामुळे शिवसेना मत म्हणजे काँग्रेसला फायदा अशी जोरदार टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नांदेड वाघाळा महापालिकेच्या निवडणूक प्रचारादरम्यान आयोजित सभेत केली.
नांदेड-वाघाळा महापालिकेसाठी बुधवारी मतदान होत आहे. त्याच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी आज सभा पार पडली. रविवारच्या प्रचारसभेत शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी थापाडयांवर विश्वास ठेवू नका अशी टीका मुख्यमंत्री आणि भाजपवर केली हेाती. पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही त्यांनी लक्ष्य केलं होतं. त्यामुळे आजच्या सभेत मुख्यमंत्री शिवसेनेला काय प्रतिउत्तर देतात याकडे सर्वांचे लक्ष वेधले होते. मुख्यमंत्रयानी काँग्रेसबरोबर शिवसेनेवर हल्ला चढविला. शिवसेनेला या ठिकाणी लढायचंच नाही. त्यामुळे त्यांच्यावर फार काही बोलण्याची आवश्यकता नाही. नांदेड जिल्हा परिषदेत युतीचा अध्यक्ष बसला असता, पण शिवसेनेने अशोक चव्हाणांना मदत केली. औरंगाबाद, परभणी हिंगोली भिवंडीत मालेगाव मध्ये शिवसेनेने काँग्रेसला मदत केल्याचा आरोप मुख्यमंत्रयानी केला. नांदेडमध्ये शिवसेना दोन आकडयापर्यंत पोहचू शकत नाही अशी खिल्ली मुख्यमंत्री उडवली. मुंबईत अशोक चव्हाणांचे फ्लॅट घेतले. पण नांदेडच्या गरिबांना झोपडी देखील मिळाली नाही. नांदेडमध्ये भ्रष्टाचार झाल्याचे कॅगच्या अहवालात म्हटले. काँग्रेसपक्ष लोणच्यासारखाही उरला नाही अशी टीका मुख्यमंत्रयानी केली.