पेट्रोल डिझेल दरवाढीविरोधात काँग्रेसचा सायकल मार्च
मुंबई : पेट्रोल व डिझेलच्या दरवाढी विराधात गुरुवारी मुंबई काँग्रेसच्या वतीने महालक्ष्मी रेसकोर्स ते गिरगांव चौपाटी भव्य सायकल मार्च काढण्यात आला होता. मुंबई कॉंग्रेससचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्या नेतृत्वाखाली सायकल मार्च काढण्यात आला. यावेळी बोलताना निरुपम म्हणाले की, जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाचे दर कमी असतानाही पेट्रोल आणि डिझेलवर भरमसाठ वाढ करून सामान्य जनतेची लूट केली जात आहे. जनतेमध्ये आज भाजप सरकारविरोधात प्रचंड संताप आणि असंतोष आहे. भाजप सरकार पेट्रोल, डिझेल आणि पेट्रोलियम पदार्थ जीएसटी अंतर्गत का आणत नाही? जर पेट्रोल आणि डिझेल ला जीएसटी अंतर्गत आणले, तर हेच वाढलेले दर अर्ध्याने कमी होतील आणि हीच मागणी घेऊन आम्ही आज हा सायकल मार्च काढला आहे, देशातील जनता इंधन दरवाढीने त्रासलेली आहे. जेवढा पेट्रोल आणि डिझेलचा दर भारतात आहे, तेवढा जगात कुठेच नाही. मुंबईत पेट्रोलचा दर आज ८२ रुपये लिटर तर डिझेलचा दर ७० रुपये प्रति लिटरच्या आसपास आहे, जो संपूर्ण भारतामध्ये फक्त मुंबईमध्येच सर्वात जास्त आहे. मुंबईच्या जनतेने असे कोणते पाप केले आहे, ज्यामुळे ही दरवाढ त्यांना सोसावी लागत आहे, तेच कळत नाही. कदाचित त्यांना निवडून दिले हीच मुंबईच्या जनतेची सर्वात मोठी चूक आहे अशी घणाघाती टीका निरुपम यांनी करून जर भाजप सरकारने इंधनाचे दर कमी करून जनतेची होणारी पिळवणूक जर थांबवली नाही. तर जनता त्यांना सत्तेतून बाहेर फेकल्याशिवाय राहणार नाही असेही निरुपम म्हणाले. या मोर्चामध्ये मुंबई काँग्रेसच्या महिला अध्यक्षा अजंता यादव, माजी आमदार चरणसिंग सप्रा, मुंबई काँग्रेसचे सरचिटणीस भूषण पाटील, काँग्रेसचे सर्व आजी माजी नगरसेवक, सर्व पदाधिकारी आणि काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने या सायकल मार्च मध्ये सामील झाले होते.