मुंबई– उच्चविद्याविभूषित प्रकांडपंडीत व भारतीय संविधानकर्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२७ वी जयंती साजरी करताना हारफूले व मेणबत्त्याऐवजी वही आणि पेनाने साजरी करावी , जमा झालेले शैक्षणिक साहित्य समाजातील आर्थिक मागास विद्यार्थ्यांना वितरित करण्यात यावे असे आवाहन एक वही एक पेन अभियानाच्या वतीने करण्यात आले आहे .
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सर्वच क्षेत्रात विपुल लिखाण असून त्यांच्याजवळील पुस्तकांचा साहित्याचा साठादेखील प्रचंड प्रमाणात आहे . त्यांनी लिहिलेल्या विविध विषयांवर मोठ्या प्रमाणात विद्यार्थी पीएचडी करीत असतात . कोलंबिया विद्यापीठाने जगातील सर्वात विद्वान व्यक्ती म्हणून त्यांचा गौरव करीत आपल्या विद्यापीठाबाहेर त्यांचा पूर्णाकृती पुतळा उभरून त्यांचा यथोचित गौरवही केला आहे . अशा महामानवाची १२७ वी जयंती येत्या १४ एप्रिल रोजी येत असून या जयंतीमध्ये डीजे ,ऑर्केस्ट्रा, महागडी लायटिंग अशा अवास्तव खर्चांना फाटा देऊन त्याऐवजी उद्योग मार्गदर्शन,समाजप्रबोधन, शासकीय योजनांची प्रशिक्षण शिबिरे आयोजित करावीत . तसेच समाजातील आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करण्यासाठी हारफूले मेणबत्त्या यांचा अतिरेक टाळून त्याऐवजी वह्या पेन आणि शैक्षणिक साहित्य डॉ, बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी अर्पण करावे ,अधिक माहितीसाठी ९८७०१८९३४१ या नंबरवर संपर्क साधावा असे आवाहन एक वही एक पेन अभियानाचे प्रमुख राजू झनके यांनी केले आहे.