आदिवासी महिलांच्या मालकीची कुक्कुटपालन करणारी राज्यातील पहिलीच कंपनी ;

 अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने पोंभुर्णा महिला पोल्ट्री प्रोडयुसर्स कंपनी लिमिटेड ची स्थापना

मुंबई ( अजय निक्ते ): राज्याचे अर्थमंत्री आणि चंद्रपूर जिल्हयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने चंद्रपूर जिल्हयातील पोंभुर्णा तालुक्यात पोंभुर्णा महिला पोल्ट्री प्रोडयुसर्स कंपनी लिमिटेड ची स्थापना करण्यात आली आहे. अशा पध्दतीची कुक्कुटपालन करणारी आदिवासी महिलांच्या मालकीची ही राज्यातील पहिलीच कंपनी आहे.

टाटा ट्रस्ट च्या सहकार्याने मूल, पोंभुर्णा व गोंडपिपरी या तालुक्यांमध्ये एक हजार आदिवासी महिलांना कुक्कुटपालन प्रकल्प सुरु करण्यात आला आहे. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात पोंभुर्णा तालुक्यातील ३४५ महिलांना कुक्कुट शेड उपलब्ध करण्यात आल्या आहेत आणि १२ एप्रिल पर्यत बॉयलर पिल्ले देखिल या महिलांना उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या आदिवासी महिलांच्या कंपनीची पहिली बोर्ड मिटींग जिल्हाधिकारी आशुतोष सलील, जिल्हापरिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या उपस्थितीत नुकतीच संपन्न झाली. या बैठकीत कंपनीच्या पुढील प्रवासाच्या व कार्याच्या दृष्टीने विस्तृत चर्चा झाली. आदिवासी महिलांच्या हक्काची ही राज्यातील प्रथमच कंपनी असून हा प्रकल्पच पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून साकारलेला महत्वपूर्ण प्रकल्प असल्याने या संदर्भात जिल्हा प्रशासन पुर्णपुणे या प्रकल्पाच्या पाठीशी असल्याचे जिल्हाधिकारी आशुतोष सलील यावेळी बोलताना म्हणाले.

भारत सरकारच्या कार्पोरेट कार्य मंत्रालयातर्फे पोंभुर्णा महिला पोल्ट्री प्रोडयुसर्स कंपनी लिमिटेड या कंपनीला  प्रमाणपत्र सुध्दा प्रदान केले असून सदर कंपनीच्या माध्यमातून कुक्कुटपालनाचा हा महत्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यात येत आहे. आदिवासी बहुल पोंभुर्णा तालुक्यात महिलांना आत्मनिर्भर करत रोजगार देणारा हा प्रकल्प निश्चितच राज्यासाठी मार्गदर्शक ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!