डोंबिवलीतील एमआयडीसीत पासपोर्ट सेवा केंद्र
डोंबिवली :- डोंबिवलीत मंजूर झालेले पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्र हे ठाणे विभागीय कार्यालयात कार्यरत असलेल्या एका उच्च पदस्थ अधिकाऱ्याच्या चुकीमुळे कल्याण (पश्चिम) येथील टपाल कार्यालयात हलवण्यात येणार होते. मात्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी पाठपुरावा केल्याने पासपोर्ट सेवा केंद्र डोंबिवलीतील एमआयडीसी निवासी विभागात सुरु होणार आहे.
कल्याण लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी डोंबिवलीसाठी पासपोर्ट सेवा केंद्र मंजूर केले होते. त्याबाबतचे पत्र देखील स्वराज यांनी खा. डॉ. शिंदे यांना गेल्या वर्षी १७ जून २०१७ रोजी पाठवले होते. डोंबिवलीत पासपोर्ट सेवा केंद्र सुरू करण्यासाठी पोस्ट ऑफिसची जागा निश्चित करण्यासंदर्भात टपाल विभाग तसेच मुंबई विभागीय पासपोर्ट कार्यालयाशी खा. डॉ. शिंदे यांनी पाठपुरावा सुरू केला होता. मात्र पुरेशी जागा नसल्याचे कारण दाखवत ठाणे विभागीय कार्यालयातील एका उच्च पदस्थ अधिकाऱ्याने कल्याण (पश्चिम) येथील टपाल कार्यालयात हलवण्याचा निर्णय घेतला होता. हे खासदारांना समजताच त्यांनी तातडीने ठाणे विभागीय कार्यालयाचे वरिष्ठ अधिक्षकांसोबत दूरध्वनीवरून चर्चा केली.व पासपोर्ट सेवा केंद्र एसआयडीसी निवासी विभागात असलेल्या पोस्ट ऑफिसमध्ये सुरू करण्यासाठीचा प्रस्ताव मुंबई विभागीय कार्यालयाला पाठवला आहे. मंगळवारी यासंदर्भात नवी दिल्ली येथे परराष्ट्र विभागाचे सचिव ज्ञानेश्वर मुळ्ये यांची भेट घेतली. या भेटी दरम्यान खा. शिंदे यांनी याबाबतची वस्तूस्थिती मुळ्ये यांच्यासमोर मांडली. त्यावर सकारात्मक प्रतिसाद देत मुळ्ये यांनी डोंबिवलीतच हे पासपोर्ट सेवा केंद्र सुरू करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.